For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपंगत्वावर मात करीत सुरेशची राष्ट्रीय स्तरावर चमक

11:32 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपंगत्वावर मात करीत सुरेशची राष्ट्रीय स्तरावर चमक
Advertisement

मनाची कणखरता व जिद्द माणसाला किती उत्तुंग जागी नेऊन ठेवेल हे कोणालाच सांगता येणार नाही. नियतीने जरी आयुष्यात अपंगत्व देवून अन्याय केलेला असला तरी ‘हम भी कुछ कम नही’ याचा प्रत्यय कोकणात व्हीलचेअर क्रिकेटच्या माध्यमातून राज्य स्तरावर कर्णधार म्हणून भूमिका बजावणारा व राष्ट्रीय पातळीवर आपली छबी उमटवणाऱ्या सुरेश जोशीने दाखवून दिले आहे. रत्नागिरी, सिधुदुर्ग, पालघर, रायगड जिह्यातून व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत एकमेव खेळाडू ठरलेल्या सुरेशने राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत कोकणाच्या शिरपेचात अनेकदा मानाचा तुरा रोवला आहे.

Advertisement

दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील गरीब कुटुंबात वाढलेल्या सुरेश जोशी हा जन्मापासून अपंग आहे. लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या सुरेशने कोणापुढे हात पसरले नाही. जिद्दीच्या जोरावर त्याने राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावरील मैदाने गाजवली. राज्याचा कर्णधार म्हणून त्याने अनेक विजेतेपदे आपल्या संघाला मिळवून दिली आहेत. राज्य स्तरावर 2008 ते 2016 मध्ये झालेल्या स्पर्धेत कर्णधार म्हणून कल्याण व रत्नागिरी जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र ब्लू रेडच्या जागतिक अपंग दिनानिमित्त झालेल्या डिसेंबर 2023 स्पर्धेत कर्णधारपद भूषवून संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिले. व्हीलचेअर क्रिकेटच्या महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्तरावर त्याला ‘बेस्ट विकेट किपर’ म्हणून देखील सन्मानित करण्यात आले. सध्या राष्ट्रीय  संघात तो यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. दिल्ली, उत्तराखंड विरूद्ध महाराष्ट्र या प्रथम सामन्यापासून दिल्ली येथून सुरेशने श्रीगणेशा केला.

स्फोटक फलंदाज म्हणून ख्याती

Advertisement

2009 मध्ये दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यानंतर 2020 मध्ये सुरेशची महाराष्ट्र संघात निवड झाली. आतापर्यंत गुजरात, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, तेलंगणा, केरळ, चेन्नई, महाराष्ट्रात मुंबई, नागपूर या ठिकाणी दमदार फलंदाजी व यष्टीरक्षणाने छाप पाडली. सुरेश हा मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारांच्या नजरा त्याच्याकडेच केंद्रीत होतात. त्याला कसे बाद करता येईल याकडे लक्ष असते. त्याच्याकडे स्फोटक फलंदाज म्हणून देखील पाहिले जाते.

सरकारचे सुरेशकडे दुर्लक्ष

अपंग असूनही जिद्दीने क्रिकेट विश्वात चार जिह्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुरेशकडे शासनाने अद्याप दुर्लक्षच केलेले आहे. त्याला क्रिकेट सरावासाठी साहित्य देखील उपलब्ध झालेले नाही. क्रिकेटची आवड असल्याने प्रथम तो स्वखर्चाने स्पर्धांच्या ठिकाणी ये- जा करत होता. मात्र आता दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खर्च उचलला जात आहे. सांगली व रत्नागिरी येथे झालेल्या स्पर्धेत त्याने रत्नागिरी जिह्याला विजेतेपद मिळवून देण्यास मोलाचे योगदान दिले आहे. सुरेशला भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचा कर्णधार रमेश सरतापे यांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असून मार्गदर्शन होत असल्याचे तो सांगतो.

भारतीय क्रिकेट संघात जाण्याची इच्छा

सुरेशला मुंबई येथील हेल्पकेअर फांउडेशनचा महात्मा गांधी सन्मान 2023 पुरस्कार देखील प्राप्त झाला असून दापोली येथील नवभारत छात्रालय व जेसीआय या संस्थांनी त्याचा सन्मानही केला. त्याला ट्रेकींगची देखील आवड आहे. आपण अपंग आहोत, कसे शिखर चढणार याचा विचार न करता त्याने कळसुबाई शिखर देखील सर केले आहे. तसेच किल्ले रायगड, लोहगड, नाणेघाट, शिवनेरी किल्ला, किल्ले रायरेश्वर, राजमाची, सागरगडवर चढाई केली आहे. सुरेशला व्हीलचेअर क्रिकेटच्या भारतीय संघात जाण्याची इच्छा असून त्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

सुरेशची पत्रकारितेत देखील छाप

सुरेश जोशी हा केवळ खेळाडू नसून पत्रकार देखील आहे. तो ‘तरूण भारत संवाद’मध्ये गेली कित्येक वर्षे वार्ताहर म्हणून काम करत आहे. त्याने आपल्या वेळवी विभागातील अनेक समस्यांना बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. अन्याय व भ्रष्टाचार याची त्याला चीड आहे हे त्याच्या लेखणीतून जाणवते. पंचक्रोशीत त्यांच्या फॅन्सची संख्या मोठी आहे.

- प्रतीक तुपे,मुरूड -दापोली

Advertisement
Tags :

.