नबाब मलिक यांना ‘सर्वोच्च’ दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नबाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालय त्यांच्या जामीनावर निर्णय देईपर्यंत त्यांचा वैद्यकीय कारणासाठीचा जमीन आहे तसाच राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांनी हा निर्णय दिला. नबाब मलीक यांच्या वकीलांनी मलीक यांची प्रकृती ढासळल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचा वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द केला जाऊ नये, असा युक्तीवाद करण्यात आला. या निर्णयामुळे मलीक यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ईडीकडून अटक
मलीक यांना फेब्र्रुवारी 2022 मध्ये ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि फरार तस्कर दाऊद इब्राहिम याच्या संपर्कात असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अटक झाल्यापासून ते कारागृहात असून काही महिन्यांपूर्वी त्यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन संमत करण्यात आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली.
उच्च न्यायालयात अर्ज
मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी प्रयत्न चालविलेले आहेत. त्यांची याचिका प्रलंबित आहे. आपल्याला अनेक व्याधी असून त्यासाठी आपल्याला दीर्घकालीन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला नियमित जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय लवकरच त्यांच्या याचिकेवर निर्णय देण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्यांचा वैद्यकीय जामीन लागू राहणार आहे.