आम आदमी पक्षाला ‘सर्वोच्च’ दिलासा
कार्यालय रिकामी करण्यासाठीची मुदत वाढली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला दिलासा देत राउज अॅव्हेन्यू येथील पक्ष कार्यालय रिकामी करण्यासाठीची मुदत वाढविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता पक्षाला 10 ऑगस्टपर्यंत पक्ष कार्यालय रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी 4 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आम आदमी पक्षाला 15 जूनपर्यंत कार्याल रिकामी करण्याचा निर्देश दिला होता. मुदत संपण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.
आम आदमी पक्षाच्या याचिकेवर न्यायाधीश विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या सुटीकालीन खंडपीठाने सुनावणी केली आहे. तर आम आदमी पक्षाच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेले युक्तिवाद ऐकून घेतल्यावर खंडपीठाने 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविली आहे. ही अंतिम मुदत असून आम आदमी पक्षाला 10 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी 206, राउज अॅव्हेन्यू येथील इमारतीवरील स्वत:चा कब्जा सोडावा लागणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
राउज अॅव्हेन्यूमध्ये ज्या ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यालय आहे, ती जागा दिल्ली उच्च न्यायालय परिसरासाठी राखून ठेवण्यात आली आहे. तसेच येथे जिल्हा न्यायालयांसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला लँड अँड डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये संपर्क करत स्वत:च्या कार्यालयासाठी भूखंड वितरित करण्याची मागणी करण्याचा निर्देश दिला होता. न्यायालयाने भूमी विकास विभागाला 4 आठवड्यांच्या आत आम आदमी पक्षाच्या अर्जावर निर्णय घेण्याचा निर्देश दिला होता.