अजित पवार गटाला ‘सर्वोच्च’ नोटीस
शरद पवार गटाच्या याचिकेवर, पक्षांतरबंदी प्रकरणी होणार सुनावणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. या गटाविरोधात शरद पवार यांच्या प्रतिस्पर्धी गटाने याचिका सादर केली आहे. ही याचिका पक्षांतरबंदी आणि आमदारांची अपात्रता या संदर्भात आहे. या गटाचे नेते जयंत पाटील यांनी ही याचिका सादर केलेली आहे.
अजित पवार गटाने राष्ट्रवादीतून बाहेर पडून आपलाच गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा दावा केला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांचा गटच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये दिला होता. या निर्णयाच्या विरोधात शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यासंदर्भात ही नोटीस काढण्यात आली आहे.
जुलै 2023 मध्ये फूट
अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांसह बाहेर पडण्याची कृती केली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झाले होते. सध्या या गटाकडे 40 आमदार असून शरद पवार गटाकडे 13 ते 14 आमदार आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
केव्हा होणार सुनावणी
या प्रकरणी केव्हा सुनावणी होणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र, अजित पवार गट आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीने या याचिकेला प्रत्युत्तर पाठविण्यात आल्यानंतर सुनावणी केली जाईल, असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या संदर्भात ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे साधारणत: 40 आमदार बाहेर पडले होते आणि त्यांनी राज्यातील भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेच्या युती सरकारला पाठिंबा दिला होता. तसेच या सरकारमध्ये सहभागही घेतला होता. या गटाचे 9 मंत्री सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री असून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदही देण्यात आले आहे.
पक्षांतरबंदी कायदा लागू होणार का ?
भारतीय राज्य घटनेच्या दहाव्या परिशिष्टात पक्षांतरबंदीचे नियम स्पष्ट केले आहेत. त्यानुसार अजित पवार गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आहे का, याचा निर्णय या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून केला जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे का याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय करणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या योग्य की अयोग्य हा महत्त्वाचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून आहे.
अध्यक्षांच्या निर्णयाचा आशय
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत पक्षफुटीसंदर्भात स्पष्ट नियम नाहीत. तसेच या पक्षाची रचना आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यांच्यासंदर्भातही स्पष्टता नाही. त्यामुळे आमदारांची संख्या या तिसऱ्या निकषाचा विचार करण्यात आला. अजित पवार गटाकडे नि:संशय दोन तृतियांशापेक्षा अधिक आमदारसंख्या आहे. त्यामुळे त्यांचा गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशी कारणे राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयपत्रात दिली आहेत. आता अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असून ही सुनावणी या निवडणुकीच्या आधी पूर्ण होऊन निर्णय येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुनावणीवर भवितव्य अवलंबून
ड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे भवितव्य या सुनावणीवर निर्भर
ड अजित पवार यांची राष्ट्रवादीच खरी आहे : विधानसभाध्यक्षांचा निर्णय
ड विधानसभाध्यक्षांच्या या निर्णयाला शरद पवार यांच्या गटाकडून आव्हान