सर्वोच्च न्यायालयाची गांधींना फटकार
इतिहासाची माहिती न घेताच विधाने करणे अयोग्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संबंधीचा इतिहास पूर्णपणे माहीत करुन न घेताच त्यांच्याविषयी बेजबाबदार विधाने करणे अयोग्य आहे, अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. इतकेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पुन्हा अशी विधाने केली तर सर्वोच्च न्यायालय अशा विधानांची स्वत:हून नोंद घेईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला. मात्र, त्यांच्याविरुद्ध लखनौच्या न्यायालयाने त्यांच्या विरोधात लागू केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती देण्यात आली.
राहुल गांधी यांनी या समन्सला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. या याचिकेची सुनावणी न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठासमोर झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटीशांचे नोकर होते, असा आरोप गांधी यांनी केला होता. सावरकर यांची अवमानना करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी अनेकवेळा केला आहे. त्यातीलच हे एक प्रकरण होते.
सिंघवी यांचा युक्तीवाद
सावरकर यांनी ब्रिटीशांना केलेल्या अर्जात आपण त्यांचे सेवक आहोत, असे विधान केले आहे. याच आधारावर राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी सावरकर यांची अवमानना केली असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. तथापि, तो न्यायालयाने अमान्य केला. महात्मा गांधीही बिटीशांना पाठविलेल्या आपल्या पत्रांच्या शेवटी ‘आपला विश्वासू सेवक’ असे लिहित असत. असे लिहिण्याची पद्धत असते. असे लिहिल्याने काही कोणी कोणाचे सेवक होत नाहीत, अशी टिप्पणी त्यांच्या युक्तीवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली.
जबाबदारीने विधाने करा
स्वातंत्र्यसैनिकांच्या संदर्भात विधाने करताना ती जबाबदारीने करण्याची आवश्यकता आहे. हे पथ्य राहुल गांधी यांनी पाळलेले दिसत नाही. उद्या कोणी महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना पाठविलेल्या पत्रांचा संदर्भ देऊन ते ब्रिटीशांचे नोकर होते, असे विधान केले तर ते चालेल काय ? असा प्रश्नही खंडपीठाने विचारला. गांधी यांनी यापुढे तरी अशा मुद्द्यांवर जबाबदारीने बोलावे. त्यांनी इतिहास नीट समजून घ्यावा आणि त्यानंतरच विधाने करावीत, असेही न्यायालयाने सुनावले.
अनेकदा अवमानजनक विधाने
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात अनेकदा जाहीररित्या अवमानजनक विधाने केली आहेत, असा आरोप आहे. त्यांनी अनेकदा सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा केला आहे. तसेच ते ब्रिटीशांचे चाकर होते. ते स्वातंत्र्यसैनिक नव्हते. ते ब्रिटीशांचे हस्तक होते, असे अनेक बेछूट आरोप त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अनेक राज्यांमधील न्यायालयांमध्ये अभियोग सादर करण्यात आले आहेत. सावरकरांच्या अवमाननेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारण्याची ही प्रथमच वेळ आहे. पुन्हा अशी विधाने कराल, तर आम्ही स्वत:हून नोंद घेऊन पुढील कारवाई करु असा इशारा न्यायालयाने दिल्याने राहुल गांधी यांना आता जपून विधाने करावी लागतील, असे तज्ञांचे मत आहे.