For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजय सिंग यांना ‘सर्वोच्च’ झटका

06:40 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
संजय सिंग यांना ‘सर्वोच्च’ झटका
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांच्या विरोधात गुजरात विद्यापीठाने अवमानना प्रकरण गुदरले आहे. या प्रकरणी सिंग यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहे. ही नोटीस स्थगित करावी, अशी मागणी करणारी सिंग यांनी सादर केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संजय सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

हे समन्स सिंग यांना गुजरातमधील एका न्यायालयाने पाठविले आहे. या न्यायालयासमोर आता त्यांना उपस्थित रहावे लागणार आहे. गुजरात विद्यापीठाचे राजिस्ट्रार पियुष पटेल यांनी सिंग यांच्या विरोधात अवमानना प्रकरण विद्यापीठाच्या वतीने सादर केले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची नोंद घेतली असून सिंग यांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स पाठविले जावे असा आदेश दिला होता.

Advertisement

जानेवारीत दिली होती स्थगिती

गुजरात विद्यापीठाने सिंग यांच्या विरोधात अवमानना प्रकरण सादर केल्यानंतर कनिष्ठ न्यायालयात त्याच्या सुनावणीला प्रारंभ करण्यात आला होता. तथापि, जानेवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयातील या सुनावणीला अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच गुजरात उच्च न्यायालयाने सिंग यांच्या याचिकेसंबंधात चार आठवड्यांमध्ये निर्णय द्यावा असा आदेश देऊन प्रकरण उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केले होते. उच्च न्यायालयाने सिंग यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाचे नेते  आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती देणे नाकारले होते.

केजरीवाल यांनाही समन्स

याच अवमानना प्रकरणात केजरीवाल हे ही एक आरोपी आहेत. त्यांनाही गुजरातच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स पाठविले आहे. केजरीवाल सध्या दिल्लीच्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणात तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती याचिका फेटाळल्याने दोन्ही आरोपींच्या विरोधात अवमानना प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी प्रमाणपत्र बनावट आहे, प्रतिपादन अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. त्यामुळे बराच गदारोळ माजला होता. मात्र, नंतर गुजरात विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी खरी आहे, असा निर्वाळा दिला होता आणि पदवी प्रमाणपत्रही आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर केजरीवाल आणि संजय सिंग यांनी या विद्यापीठासंबंधी अवमानजनक शब्दांचा उपयोग करुन टिप्पणी केली होती. त्यामुळे विद्यापीठाने या दोन्ही नेत्यांविरोधात अवमानना प्रकरण सादर केले होते.

Advertisement
Tags :

.