पाण्याचा योग्यप्रकारे पुरवठा करा!
महिला-बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची अधिकाऱ्यांना सूचना : मलप्रभा पाणीपुरवठा सल्ला समितीची बैठक
बेळगाव : गेल्यावर्षी अपेक्षेनुसार पाऊस झाला नसल्याने नागरिकांसह जनावरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पुढील वर्षापर्यंत शेतकऱ्यांना व जनावरांना पाण्याचा योग्यप्रकारे पुरवठा करण्यात यावा, असे महिला आणि बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. सौंदत्ती येथील नविलतीर्थ, सुपरिटेंडेंट इंजिनिअरिंग कार्यालयामध्ये मलप्रभा योजना 2024-25 वर्षातील पाणी पुरवठा सल्ला समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात बैठकीचे नियोजन करून आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी योजना आखण्यात यावी. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासाठीही आवश्यक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा, जलाशयामध्ये येणाऱ्या पाण्यासह जलाशयातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या पातळीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष रहावे, अशी सूचना त्यांनी केली.
गेल्या 50 वर्षात रेणुका सागर जलाशय निर्माण केल्यानंतर केवळ पाच वेळाच पूर्ण क्षमतेनेच भरला आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने हा जलाशय भरण्याच्या मार्गावर आहे. परंपरेनुसार जलाशयाचे गंगापूजन करण्यात यावे. या भागातील शेतकऱ्यांना सोय होईल. यासाठी पाण्याचा सुरळीत पुरवठा करावा, अशी सूचना मंत्री हेब्बाळकर यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी जलाशयाच्या पाण्याच्या पातळीची माहिती दिली. 37 टीएमसी पाण्याची क्षमता असून 15 टीएमसी पाणी पिण्यासाठी वापरले जाते. उर्वरीत पाणी पुढील वेळेपर्यंत काटकसरीने वापरले जाते. यामुळे पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा केला जात नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार येऊनही दखल दिली जात नसल्याची तक्रार शेतकरी नेत्यांनी मांडली. अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली. उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी सोडून शेतकऱ्यांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नरगुंदचे आमदार सी. सी. पाटील बोलताना म्हणाले, उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी सोडले जावे. गेल्या वर्षी अनावश्यक पाणी पुरवठा करण्यात आल्याने नरगुंद भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. याची दखल घेऊन पाणी पुरवठा करावा, अशी सूचना त्यांनी केली. कालव्यांची स्वच्छता करण्यात यावी, दुरुस्ती कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी. अशा सूचनाही बैठकीत मांडण्यात आल्या. यावेळी आमदार विश्वास वैद्य, बदामीचे आमदार भिमसेन चिम्मनकट्टी, नवलगुंद आमदार एन. एच. कोनरेड्डी, मलप्रभा सल्ला समिती सदस्य यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.