आरोग्य संस्थांना मागणीनुसार औषधांचा पुरवठा करा
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : औषध गोदामाची पाहणी
बेळगाव : जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बुधवार दि. 24 रोजी शहरातील जिल्हा औषध गोदामाला अचानक भेट देऊन पाहणी केली. गोदामातील औषधांचा संग्रह व कर्मचाऱ्यांच्या हजेरीची माहिती घेतली. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना औषधांचा पुरवठा योग्यरितीने करावा, असे सांगितले. आरोग्य संस्थांच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येत असल्याची खातरजमा करून घेतली. जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांची संख्या सारखी नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येनुसार व आरोग्य संस्थांच्या आवश्यकतेनुसार औषधांचा पुरवठा करावा, अशी सूचना गोदामाच्या प्रमुखांना केली. औषधांची कालमर्यादा संपलेली नाही यावर लक्ष ठेवावे. मुदतबाह्या औषधांची वैज्ञानिकरित्या विल्हेवाट लावावी. आरोग्य संस्थांनी स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधे ई-औषध सॉफ्टवेअरमध्ये नोंद करावीत, अशा सूचनाही शिंदे यांनी केल्या. यावेळी जि. पं. चे उपसचिव बसवराज अडवीमठ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आय. पी. गडाद, जिल्हा औषध गोदाम प्रमुख शिवानंद सोनटक्की व गोदामातील कर्मचारी उपस्थित होते.