सुपर फोर फेरी : बांगलादेश-श्रीलंका लढत आज
वृत्तसंस्था/ दुबई
आशिया कपच्या आज शनिवारी येथे होणाऱ्या पहिल्या सुपर फोर सामन्यात श्रीलंका त्यांच्या गटातील अपराजित मोहिमेतून प्रेरणा घेईल आणि सातत्य नसलेल्या बांगलादेशविऊद्ध निश्चितपणे त्यांचे पारडे जड राहील.
चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने गट ‘ब’मध्ये तीन सामन्यांत तीन विजय मिळवले आणि बांगलादेश आणि टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या अफगाणिस्तानपेक्षा पुढे राहिले. श्रीलंकेने बांगलादेशला सहा गड्यांनी हरवले, तर हाँगकाँग आणि अफगाणिस्तानला अनुक्रमे चार आणि सहा गड्यांनी हरवले. परंतु श्रीलंकेचा संघही कोसळू शकतो. सलामीवीर पथुम निस्सांकाच्या अर्धशतकानंतर देखील सोमवारी हाँगकाँगविऊद्ध ते जवळजवळ पराभूत झाले होते.
हरारे येथे झिम्बाब्वेने 80 धावांवर गारद केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनी हाँगकाँगविऊद्ध ते एका पराभवाच्या उंबरठ्यावर होते, पण सुदैवाने बचावले. त्यामुळे श्रीलंकेची कमकुवत मधली फळी ही प्रमुख चिंता आहे. श्रीलंकेसाठी निस्सांका फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे, त्याने तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह 124 धावा केल्या आहेत. दोन निराशाजनक खेळींनंतर यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने अखेर अफगाणिस्तानविऊद्ध 52 चेंडूंत 74 धावा करत आक्रमक खेळी केली. डावखुरा कामिल मिशारा देखील चांगल्या लयीत आहे.
परंतु श्रीलंकेला कर्णधार असलंका, वरिष्ठ फलंदाज कुसल पेरेरा आणि दासुन शनाका यांच्याकडून मधल्या फळीत योगदानाची अपेक्षा असेल. तिन्ही गट सामन्यांमध्ये श्रीलंकेने पाठलाग करताना विजय मिळविला आणि शनिवारीही नाणेफेक जिंकल्यास श्रीलंका तोच प्रवाह कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. फलंदाजीव्यतिरिक्त श्रीलंकेने गोलंदाजी आणि मैदानी क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज नुवान तुषारा हा स्पर्धेत आतापर्यंत पाच बळींसह चौथ्या क्रमांकावर आहे. दुष्मंथ चामीरा देखील नवीन चेंडूसह बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये आहे. मधल्या षटकांमध्ये वानिंदू हसरंगा, असलंका आणि दासुन शनाका यांनी चांगली कामगिरी केली आहे. पण श्रीलंकेला अष्टपैलू दुनिथ वेलालागेची उणीव भासेल. कारण तो गुऊवारी रात्री त्याचे वडील सुरंगा यांचे निधन झाल्याने स्पर्धेतून घरी परतला आहे.
दुसरीकडे, बांगलादेशने श्रीलंकेच्या कृपेने सुपर फोर टप्प्यात प्रवेश केला आहे. जर गुऊवारी श्रीलंकेचा अफगाणिस्तानविऊद्ध पराभव झाला असता, तर बांगलादेश बाहेर पडले असते. बांगलादेशची सातत्यहीन फलंदाजी ही एक मोठी चिंता आहे. कर्णधार लिटन दास 96 धावांसह स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याला तसेच सैफ हसन, तन्झिद हसन आणि तौहिद हृदोय यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. बांगलादेशला एकूणच सुधारणेची गरज आहे, कारण त्यांचे क्षेत्ररक्षण सुमार राहिले आहे आणि त्यांचे गोलंदाजही आक्रमक फलंदाजीसमोर अनेकदा कोलमडले आहेत. बांगलादेशला लंकेच्या फलंदाजांना अस्वस्थ करण्याच्या दृष्टीने नसुम अहमद आणि मुस्तफिझूर रहमान यांच्याकडून अपेक्षा असतील.
संघ : श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस कुसल पेरेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, चमिका कऊणारत्ने, महेश थीक्षाना, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना.
बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद ह्रदोय, जाकेर अली, शमीम हुसेन, नुऊल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन, तस्कीन अहमद, शरीफुल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.