शेडबाळमध्ये सुपार्श्वसेन मुनींचे समाधी मरण
मुनी महाराजांवर आश्रमात मंत्रोच्चार, विधिपूर्वक अंत्यविधी संस्कार
वार्ताहर/कागवाड
कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरातील आचार्य शांतीसागर जैन आश्रमात, आचार्य श्रमणरत्न सुबलसागर मुनी महाराज यांचे परमशिष्य सुपार्श्वसेन मुनी महाराजांनी यमसल्लेखन व्रत स्वीकारले. त्यांना दहाव्या दिवशी रविवारी रात्री 10:53 वाजता समाधीमरण प्राप्त झाले. अंतिम धार्मिक संस्कार सोमवारी सकाळी झाले. सोमवारी आश्रमात आचार्य धर्मसेन, जिनसेन, शांतीसेन मुनी महाराज व माताजींच्या सान्निध्यात, जैन समाजाचे कर्नाटक पुरोहितरत्न आनंद उपाध्ये यांनी इतर पुरोहितांसह मंत्रोच्चार व विधिपूर्वक अंत्यविधी संस्कार पार पाडले.
सुपार्श्वसेन मुनी महाराजांनी 1999 साली बाबानगर येथे श्रमणरत्न सुबलसागर मुनी महाराजांकडून मुनी दीक्षा स्वीकारली होती. गेल्या 26 वर्षांपासून ते धर्मसेवेत तत्पर होते. मुनी होण्यापूर्वी ते अथणी तालुक्यातील महेशवाडगी येथील एका शेतकरी परिवारातील होते. वडील नेमिनाथ रेंगौडर व आई कृष्णाबाई यांचे ते पुत्र होत. सोमवारी सकाळी आचार्य धर्मसेन मुनी महाराजांच्या उपस्थितीत मुनिसंघातर्फे विनयांजली अर्पण करण्यात आली.
अंत्यविधी कार्यक्रमास कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध गावांमधून हजारो श्रावक-श्राविका उपस्थित होत्या. अंत्यविधी कार्यक्रमासाठी मुंबईचे उद्योजक पंकज कोठडिया, बाळासाहेब हरवी, बाबा अनाजे, सचिन रेंगौडर, विमल मात्रे, पुरोहितांनी पंचामृत अभिषेक केला. आश्रमाचे व्यवस्थापक राजू नांद्रे, कर्नाटक जैन असोसिएशन उपाध्यक्ष शितल पाटील, वकील एस. बी. मुन्नोळी, सुभाष उपाध्ये, महेंद्र उपाध्ये, बाहुबली उपाध्ये, कुमार अलगौडर, अरुण यलगुद्री, किरण एंदगौडर, बेळगावचे उद्योगपती राजू जक्कनवर, भरत नांद्रे, सतीश हजारे, भरत नरसिंगौडर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समाधी मरणानंतर शांतीसागर आश्रमाची हत्ती पद्मावतीने स्वामीजींना विनयांजली अर्पण केली.