Satara : सुपनेच्या शेतकऱ्यांची 'महावितरण'वर धडक
कराडमध्ये महावितरणविरोधात संतप्त मोर्चा
कराड : अनेक वर्षापासून मागणी करूनही शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यास महावितरण कंपनीला अपयश आले आहे. सतत खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीजपुरवठा करणारे डीपी, खांब, ट्रान्सफॉर्मर, तारा यांची अवस्था दयनीय झाल्याने शेतकरी व सामान्य माणसांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्री शेतीला पाणी देताना बिबट्या, साप, विंचू अशा संकटांचा सामना करावा लागतो.
या सर्व गलथान कारभारामुळे संतप्त होऊन कराड तालुक्यातील सुपने, पश्चिम सुपने, साकुर्डी, भोळेवाडी, वसंतगड, बेलदरे, आबईचीवाडी, केसे, पाडळी, विजयनगर येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
याप्रसंगी शेतकऱ्यांनी प्रामुख्याने शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याची जोरदार मागणी केली.यावेळी कार्यकारी अभियंता विशाल ग्रामोपाध्ये व इतर अधिकाऱ्यांजवळ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त भावना व्यक्त करून उपकार्यकारी अभियंता विशाल ग्रामोपध्ये यांना लेखी निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याची ग्वाही दिली. तसेच कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. शेतीला लवकरात लवकर दिवसा वीज पुरवठा करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.