सुपा जलाशयाची पाणीपातळी अद्याप 67 टक्क्यांवर
ऊर्जा महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून विसर्गाचा पहिला इशारा : काळी नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना
कारवार : जोयडा तालुक्यातील काळी नदीवरील गणेशगुढी (सुपा) जलाशय 67.22 टक्के इतका भरला आहे. त्यामुळे जलाशयातील विसर्गाचा पहिला इशारा सुपा येथील कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे. सुपा जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 564 मीटर इतकी आहे आणि धरणातील पाण्याचे सामर्थ्य 147.55 टीएमसी इतके आहे. आजअखेर पाण्याची पातळी 551.60 मीटर इतकी आहे तर पाण्याचे सामर्थ्य 99.175 टीएमसी इतके झाले आहे. सुपा जलाशयाचे पाणलोट क्षेत्र लाभलेल्या जोयडा तालुक्यात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या दक्षिण भागात आणि गोवा राज्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे.सुपा धरणात सुमारे 26 हजार क्युसेक इतके पाणी वाहून येत आहे. अशाचप्रकारे पाण्याची आवक राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीने जलाशयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी करण्यात येईल. त्याकरिता काळी नदीच्या काठावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांनी जीवनोपयोगी साहित्य आणि जनावरांसह सुरक्षितस्थळी निघून जाण्याची सूचना कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे.
मासेमारीसाठी उतरू नये
याशिवाय काळी नदीच्या पात्रात पावसाळा संपेपर्यंत होडी प्रवास आणि मासेमारीसाठी उतरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लिंगनमक्की जलाशयात गेल्या वर्षाच्या तुलनेत 50 फूट अधिक पाणी
शरावती नदीवरील लिंगनमक्की धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 50 फूट अधिक भर पडली आहे. गेल्यावर्षी आजअखेर लिंगनमक्की जलाशयातील पाण्याची पातळी 1749.45 फूट इतकी होती. यावर्षी ती आजअखेर 1809.15 फूट इतकी झाली आहे. लिंगनमक्की जलाशयाचे पाणलोट क्षेत्र लाभलेल्या शिमोगा आणि कारवार जिल्ह्यातील काही भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे 40 हजार 382 क्युसेक इतके पाणी वाहून येत आहे. या जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 1819 फूट इतकी असून आता हे धरण कुठल्याही क्षणी तुडुंब भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गानंतर याचा फार मोठा फटका होन्नावर तालुक्यातील अनेक गावांना बसत असतो.