महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विक्रमी धावसंख्येच्या सामन्यात सनरायजर्स विजयी

06:58 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर अभिषेक, हेड, क्लासेन यांची जलद अर्धशतके, तिलक वर्माचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

आयपीएलमधील हायस्कोअरिंग ठरलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या रचल्यानंतर जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या मुंबई इंडियन्सचा केवळ 31 धावांनी पराभव करून या मोसमातील पहिला विजय नोंदवला. 23 चेंडूत 63 धावा झोडपणाऱ्या अभिषेक शर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला. बुधवारी झालेल्या आयपीएलमधील या सामन्यात नवे विक्रम नोंदवले गेले. सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करीत 20 ष टकांत 3 बाद 277 धावांचा पाऊस पाडत सर्वाधिक धावांचा आरसीबीचा विक्रम मोडित काढून नवा विक्रम नोंदवला. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सनेही जोरदार प्रयत्न केले. पण अखेर त्यांना 20 षटकांत 5 बाद 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईतर्फे पहिल्या सातही फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. रोहित शर्मा व इशान किशन यांनी जोरदार सुरुवात करताना 20 चेंडूतच 56 धावा फटकावल्या. उत्तुंग फटका मारताना इशान बाद झाला. त्याने 13 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 34 धावा काढल्या. रोहित शर्माही कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 12 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार ठोकले. नमन धीरनेही फटकेबाजी कायम ठेवत 14 चेंडूत 30 धावा काढल्या. त्याने तिलक वर्मासमवेत 37 चेंडूत 84 धावांची भर घातली. तिलक वर्मा 34 चेंडूत

 64 धावा काढून बाद झाला. त्याच्या खेळीत 2 चौकार, 6 षटकारांचा समावेश होता. कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अपेक्षापूर्ती करू शकला नाही. त्याने 20 चेंडूत 24 धावा केल्या. टिम डेव्हिड व रोमारिओ शेफर्ड यांनी अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी केली. पण ती पुरेशी ठरली नाही. डेव्हिड 22 चेंडूत 42 तर शेफर्ड 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिले. डेव्हिडने 2 चौकार, 3 षटकार तर शेफर्डने 2 चौकार, 1 षटकार मारला. सनरायजर्सने मधल्या 3 षटकात मुंबईच्या धावगतीला लगाम घातला होता, तोच शेवटी निर्णायक ठरला. कमिन्स व उनादकट यांनी प्रत्येकी 2 तर शाहबाज अहमदने 1 बळी टिपला. मुंबईचा हा दुसरा पराभव आहे.

विक्रमी धावा

या सामन्यात तब्बल 523 धावा निघाल्या आणि दोन्ही संघांकडून मिळून विक्रमी 38 षटकार नोंदवले गेले. याशिवाय 31 चौकार नोंदवले गेले. हैदराबादने 28 चेंडूत 50 तर मुंबईने 18 चेंडूत 50 धावा फटकावल्या. हैदराबादने शतक 43 चेंडूत, द्विशतक 90 चेंडूत तर मुंबईने शतक 45 चेंडूत व द्विशतक 101 चेंडूत नोंदवले. या सामन्यात दोन्ही संघांतील फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली.

हेड-अभिषेकची तुफानी फटकेबाजी

मुंबईकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर ट्रॅव्हिस हेड (केवळ 24 चेंडूत 62 धावा) व अभिषेक शर्मा (23 चेंडूत 63) यांनी सनसनाटी खेळ करीत पॉवरहिटिंगचे जबरदस्त दर्शन घडविले. सनराजयर्सतर्फे वेगवान अर्धशतकाचा विक्रम हेडने नोंदवल्यानंतर काही मिनिटातच अभिषेकने तो विक्रम मोडित काढत नवा विक्रम नोंदवला. हेन्रिच क्लासेनने अखेरच्या टप्प्यात आतषबाजी करीत 34 चेंडूत नाबाद 80 धावा झोडपत सनरायजर्स हैदराबादला 11 वर्षे अबाधित राहिलेला सर्वाधिक धावांचा मोडण्यास मदत केली. 2013 मधील आयपीएलमध्ये आरसीबीने 5 बाद 263 धावांचा विक्रम प्रस्थापित केला होता. या सामन्यात चौकार, षटकारांची आतषबाजी पहावयास मिळाल्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्णपणे निष्प्रभ ठरविली. सनरायजर्सच्या पहिल्या सामन्यात हेडला वगळण्यात आले, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. पण आज त्याने या प्रकारातील सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याने डेव्हिड वॉर्नरचा सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडताना 18 चेंडूत अर्धशतक झळकवले. पण नंतर अभिषेकने 16 चेंडूत अर्धशतक नोंदवत हा विक्रमही मागे टाकला.

हेडला सुरुवातीलाच टिम डेव्हिडकडून जीवदान मिळाले होते. त्याचा त्याने पुरेपूर लाभ घेत मनाप्रमाणे चौकारांची बरसात केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार, 3 षटकार ठोकले. त्याने कोएत्झीला चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर उसळत्या चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. तो बाद झाल्यानंतर अभिषेकने आतषबाजी पुढे चालू ठेवली. त्याने आपल्या खेळीत 7 षटकार व 3 चौकार मारले. युवा विश्वचषक स्पर्धा गाजविलेला दक्षिण आफ्रिकेचा 17 वर्षीय गोलंदाज क्वेना माफाकासाठी मात्र आयपीएल पदार्पण दु:स्वप्नच ठरले. त्याच्या 4 षटकांत तब्बल 66 धावा झोडपल्या गेल्या. त्याच्या दुसऱ्या षटकात हेडने 22 धावा तडकावल्या, त्यातून तो सावरू शकला नाही. कर्णधार हार्दिक पंड्याचा बुमराहला एक षटक दिल्यानंतर 13 व्या षटकात त्याला पुन्हा आणण्याचा निर्णयही सर्वांना चकित करणारा ठरला. अभिषेक बाद झाल्यानंतर क्लासेन फटकेबाजी पुढे चालू ठेवली. त्यानेही 7 षटकार व 4 चौकारांचा बरसात केली. याशिवाय हैदराबादचा माजी कर्णधार एडन मार्करमनेही 28 चेंडूत नाबाद 42 धावा फटकावताना 2 चौकार, 1 षटकार मारला. मुंबईच्या हार्दिक, चावला व कोएत्झी यांनी एकेक बळी मिळविला. पण बुमराहने 4 षटकांत केवळ 36 धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली. त्याला फक्त क्लासेनने एक षटकार मारला.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 3 बाद 277 : मयांक अगरवाल 13 चेंडूत 11, हेड 24 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह 62, अभिषेक शर्मा 23 चेंडूत 3 चौकार, 7 षटकारांसह 63, मार्करम 28 चेंडूत नाबाद 42, क्लासेन 34 चेंडूत 4 चौकार, 7 षटकारांसह नाबाद 80, अवांतर 19. हार्दिक 1-46, कोएत्झी 1-57, चावला 1-34, बुमराह 0-36.

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 246 : रोहित शर्मा 12 चेंडूत 1 चौकार,. 3 षटकारांसह 26, इशान किशन 13 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 34, नमन धीर 14 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 30, तिलक वर्मा 34 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह 64, हार्दिक पंड्या 20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 24, टिम डेव्हिड 22 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 42, शेफर्ड 6 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 15, अवांतर 11. उनादकट 2-47, कमिन्स 2-35, शाहबाज अहमद 1-39.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article