सनरायजर्स हैदराबादचा पराभवाचा ‘चौकार’
गुजरात टायटन्सचा 7 गडी राखून विजय : सामनावीर मोहम्मद सिराजचे 4 बळी : शुभमन गिल-वॉशिंग्टन सुंदरची धमाकेदार खेळी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
मोहम्मद सिराजच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानातच पराभवाचा धक्का दिला. सिराजच्या (17 धावांत 4 बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादला 152 धावांत रोखले. त्यानंतर या आव्हानाचा लीलया पाठलाग करत गुजरातने सात विकेट्स राखत दणदणीत विजय साकारला. या विजयासह गुजरातचा संघ सहा गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, सिराजने आयपीएलमध्ये 100 विकेट्स पटकावत इतिहास रचला, कारण चार बळी मिळवत तो संघासाठी मॅचविनर ठरला. शुभमन गिलने यावेळी नाबाद 61 धावांची खेळी साकारली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. सिराजने पहिल्याच षटकात हैदराबादला मोठा धक्का दिला. पहिल्या षटकात दोन चौकार गेले होते. पण पाचव्या चेंडूवर अखेर त्याने ट्रेव्हिस हेडला बाद केले आणि गुजरातला मोठे यश मिळवून दिले. यानंतर सिराजने सलामीवीर अभिषेक शर्मालाही (18) माघारी पाठवले. पाठोपाठ इशान किशनही (17) बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला स्थिरावू दिले नाही. 50/3 वरून हेन्रिक क्लासेन आणि नितीश रेड्डी यांनी 50 धावांची भागीदारी केली. साई किशोरने क्लासेनला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने 27 धावा केल्या. पुढच्याच षटकात नितीश रेड्डीला माघारी धाडत हैदराबादला अडचणीत आणले. त्याने 31 धावा केल्या. उर्वरित षटकांमध्ये अनिकेत वर्मा (14 चेंडूत 18) आणि कर्णधार पॅट कमिन्स (नाबाद 22) यांनी उपयुक्त खेळी करत हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावत 152 धावापर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करताना 17 धावांत 4 गडी बाद केले.

गिलची अर्धशतकी खेळी, गुजरातचा सहज विजय
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शन (5) मोहम्मद शमीची शिकार ठरला. पॅट कमिन्सने जोस बटलरला भोपळाही फोडू दिला नाही. यावेळी गुजरातची 2 बाद 16 अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. गुजरातसाठी पदार्पणात वॉशिंग्टनने 49 धावांची सुरेख खेळी साकारली. शमीच्या गोलंदाजीवर अनिकेत वर्माने सुरेख झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. कर्णधार शुभमनने सूत्रधाराची भूमिका निभावत संयमी अर्धशतकी खेळी साकारली. वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर शेरफन रुदरफोर्डने वेगवान पवित्रा स्वीकारला. त्याने अभिषेक शर्माच्या एका षटकात 18 धावा वसूल केल्या. गिलने 43 चेंडूत 61 धावांची खेळी केली. रुदरफोर्डने 16 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 152 (अभिषेक शर्मा 18, इशान किशन 17, नितीश कुमार रे•ाr 31, क्लासेन 27, पॅट कमिन्स नाबाद 22, मोहम्मद सिराज 17 धावांत 4 बळी, साई किशोर व प्रसिध कृष्णा प्रत्येकी दोन बळी)
गुजरात टायटन्स 16.4 षटकांत 3 बाद 153 (शुभमन गिल नाबाद 61, वॉशिग्टंन सुंदर 49, रुदरफोर्ड नाबाद 35, मोहम्मद शमी 2 तर कमिन्स 1 बळी).