सनरायझर्स हैदराबाद ‘प्लेऑफ’साठी पात्र
वृत्तसंस्था /हैदराबाद
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेतील गुरुवारचा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकताना पावसामुळे रद्द करावा लागला. या स्पर्धेत प्लेऑफसाठी पात्र ठरणारा सनरायझर्स हैदराबाद हा तिसरा संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी यापूर्वीच प्लेऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले होते. स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील रद्द झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. हैदराबाद संघाने 15 गुण घेतले असून त्यांचा एक सामना बाकी आहे. हैदराबादचा शेवटचा सामना पंजाब किंग्ज बरोबर 19 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेतील प्राथमकि फेरीतील हा शेवटचा सामना आहे. पंजाब संघाचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे. 2022 साली आयपीएल स्पर्धा जिंकणारा तर 2023 साली आयपीएल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचे प्लेऑफ शर्यतीतील आव्हान यापूर्वीच्या सामन्यात संपुष्टात आले होते. गुजरातचा 13 मे रोजीचा कोलकाता संघाबरोबरचा सामना पावसामुळे वाया गेला होता. गुजरात टायटन्सने 2024 च्या आयपीएल स्पर्धेत 14 सामन्यातून 12 गुणासह आपली मोहित संपुष्टात आणली.