सनी देओलने धोका दिला... यावेळी अशी फसवणूक करून घेऊ नका! केजरीवाल यांचे टीकास्त्र
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सनी देओलला मतदान न करता सामान्यांना मतदान करा, तो लोकसभा मतदारसंघात येतही नाही असे म्हणत अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल वर निशाणा साधला आहे. पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये १८५४ कोटी रुपयांच्या विकास योजनांचा शुभारंभ करताना केजरीवाल यांनी सनीच्या मतदारसंघात जाऊन त्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी केजरीवाल यांनी भाजपावरही जोरदार टीका केली.
अरविंद केजरीवाल म्हणाले "मागील लोकसभा निवडणुकीत तुम्ही लोकांनी सनी देओलला निवडून पाठवले होते. पण तो कधी आला, कधी त्याचा चेहरा पाहिला का? कधीच आला नाही. तो एक चांगला अभिनेता आहे असे आपल्याला वाटायचे. तो चांगले काम करेल, त्यामुळे मत दिले. पण ही मोठी लोक काहीच करणार नाहीत.""सामान्य लोकांना मतदान करा, ते तुमच्यासाठी काम करतील. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमचा फोन उचलला जाईल. घरी जेव्हा गरज असेल तेव्हा घरीही येतील. दुसऱ्या पक्षाच्या फंदात पडू नका. मागील दीड वर्षात आम्ही जे काम केले आहे, त्याच्या आधारावर मतदान करा. सनी देओलने ज्या प्रकारे धोका दिला आहे, यावेळी मात्र अशी फसवणूक करून घेऊ नका", अशा शब्दांत त्यांनी देओलवर टीकास्त्र सोडले.