For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनीताचे पुनरागमन आणि संशोधन क्षितिजावर उष:काल

06:22 AM Mar 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुनीताचे पुनरागमन आणि संशोधन क्षितिजावर उष काल
Advertisement

अद्वितीय विक्रम आणि उज्वल यशाचा आलेख बिंदू असेच सुनीता यांच्या यशस्वी पुनरागमनाचे वर्णन करता येईल. मानवी कल्याणात आणि मानव विकासात एक मोठे सोनेरी पान सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ यात्रेमुळे लिहिले गेले आहे. ज्ञान, निष्ठा आणि साहस तसेच महत्त्वाकांक्षा यांचा सुवर्णसंगम घडविल्यामुळे त्यांच्या जीवनयात्रेतील हा कुंभमेळा सातासमुद्रापलीकडे अनंत ब्रह्मांडात पोहोचू शकला.

Advertisement

अशक्य शक्य ते करून दाखविणाऱ्या व्यक्तीस प्रतिभाशाली व्यक्ती असे म्हणतात. परंतु प्रतिभाशाली व्यक्तीलाही जे शक्य होत नाही ते संपादन करणारी व्यक्ती तेज:पुंज हिरा असते. या सत्याचा प्रत्यय सुनीता यांच्या जीवनावरून येतो. नऊ महिन्यांपेक्षा अधिकचा काळ अंतराळात घालविल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुखरुपपणे परतले आणि अमेरिकेत फ्लोरिडाच्या भूमीवर त्यांचे पुनरागमन झाले. पृथ्वीवर त्यांचे सुरक्षित परत येणे ही बाब उभ्या मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने एक वरदान ठरणारी आहे. बुधवारी त्या आपल्या सुखरुप उतरल्या आणि त्यांचे अंतराळातील शोधकार्याचे हे मिशन अपूर्व, अद्भुत आणि स्पृहणीयरित्या पूर्ण झाले. भारताच्या इस्रो आणि अमेरिकेतील नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेतील अधिकाऱ्यांनी अंतराळवीरांच्या सुरक्षित व सुखरुप परतीचा जल्लोष साजरा केला. नासा तसेच स्पेसएक्स या उभयतांनी या संशोधन कार्यासाठी अत्यंत समर्पण भावनेने कार्य केले. त्यामुळे हे अपूर्व यश संपादन करणे शक्य झाले. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी हे एक उल्लेखनीय यश असल्याचे नमूद केले आहे. समन्वय, सुसंवाद आणि सुनियोजन हे या मोहिमेतील यशाचे खरे फलित होय.

तांत्रिक बिघाडाचे वरदान?- खरेतर, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या चमूचा मुक्काम अंतराळात फक्त 8 दिवस एवढाच होता. परंतु बोईंग अंतराळ यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा कालावधी लांबला आणि त्यांना 9 महिने अंतराळात रहावे लागले. या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या वास्तव्याचे स्वरुप पाहता, अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण बऱ्याचवेळा अनंत अडचणी या सुद्धा शोधकार्याच्या प्रगतीचे गमक ठरतात. आठ दिवसांचा कालावधी नऊ महिन्यात रुपांतरीत झाला आणि या काळात त्यांच्या वास्तव्यातून करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण नोंदी या मानवी आरोग्य आणि अंतराळविद्या यादृष्टीने संशोधनास वरदान ठरणार आहेत. बऱ्याच वेळा अडचणीमुळे निर्माण झालेली परिस्थिती ही आव्हानात्मक प्रश्न निर्माण करते आणि या प्रश्नांच्या उत्तरामध्ये संशोधनाचे खरे रहस्य सामावलेले असते.

Advertisement

अंतराळातील प्रदीर्घ वास्तव्यात गुरुत्वाकर्षण नसताना तेथील तरंगत्या स्थितीत राहण्यासाठी माणसाला आणि मानवी देहाला कराव्या लागणाऱ्या संघर्षाची कृती मोठी अद्भुत, रोमांचक आणि तेवढीच अनेक नवीन समस्यांची उकल करणारी ठरणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने तीन प्रश्नांची सोडवणूक होईल असे वाटते. पहिले म्हणजे अंतराळात दीर्घकाळ राहण्यासाठी मानवाला कुठल्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो, दुसरे म्हणजे या कालावधीत मानवी जीवनाचे चक्र, दिनचर्या कशी चालते व त्यातील संघर्ष, सुसंवाद आणि समन्वय कोणत्या घटकांवर अवलंबून असतो, तसेच तिसरे म्हणजे मानवी आरोग्यातील अनेक कूटप्रश्नांना, समस्यांना उत्तरे देण्यासाठी अंतराळातील परिवेश कितपत फलदायी ठरू शकतो या तीन यक्षप्रश्नांची उकल प्रस्तुत प्रदीर्घ वास्तव्य कालावधीतील प्रयोगांच्या नोंदींवरून होऊ शकेल. त्यामुळे मानवी जीवनास भेडसावणाऱ्या कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर सुद्धा उपाय शोधता येऊ शकतो. कुठल्या परिस्थितीत मानवी पेशी भक्कम राहतील आणि कुठल्या परिस्थितीत पेशींमध्ये घट होते व ती कशी थांबविता येते या प्रकारचे अनेक प्रश्न अंतराळातील दीर्घ वास्तव्यातील अनुभवावरून आणि प्रयोगावरून सोडविता येऊ शकतील. मानवाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंतराळातील वातावरण प्रयोगासाठी किती अनुकूल ठरू शकते याचाही शोध घेतला जात आहे. जैव तंत्रज्ञान, सूक्ष्म पदार्थ विज्ञान तसेच वैद्यक व आरोग्यशास्त्र आणि या पलीकडे जाऊन समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि या काळातील संज्ञापनातील जटिल प्रक्रियांची जडणघडण अशा अनेक पैलूंनी हे संशोधन आंतरविद्याशाखीय समस्या सोडविण्यासाठी फलदायी ठरू शकेल. सुनीता व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपादन केलेल्या कौशल्यांचा उपयोग केवळ अमेरिका व भारत या देशांनाच नव्हे तर उभ्या जगातील मानवाच्या कल्याणासाठी होणार आहे. सुनीता विल्यम्स यांचा हा विजय म्हणजे यशाचा चढता आलेख होय. 1998 मध्ये नासाने त्यांची पहिल्यांदा अंतराळवीर म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 30 पेक्षा अधिक विमान प्रकारांमध्ये 3000 पेक्षा अधिक उ•ाणे त्यांनी पूर्ण केली.

कोटीच्या कोटी उ•ाणे?- 2017 मध्ये त्या नौदल सेवेतून निवृत्त झाल्या आणि पुढे त्यांनी अंतराळ संशोधन हेच आपले जीवनकार्य मानले. 1998 मध्ये नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले. एसटीएस-116, मोहिम 14 आणि 15 यामधील त्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. अंतराळ मालिकेत त्यांनी दमदार पाऊल टाकले. मोहिम 32 व 33 गाजविली. व्यावसायिक क्रू कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला. सुनीता विल्यम्ससह निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन सल्लागार अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे सारे स्पेसएक्सच्या ड्रॅगन या कॅप्सूलने अमेरिकेत बुधवारी फ्लोरिडाच्या किनारी सुखरुप उतरले. त्यामुळे जगाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुनीता यांच्या व्यक्तिमत्वातील धैर्य, अपूर्व साहस आणि जिद्द या गुणांमुळे त्या अंतराळ संशोधनात इतिहास घडवू शकल्या आहेत. अंतराळाच्या नभांगणातील एक तेजस्वी तारका म्हणून त्यांनी जोपासलेले अध्ययनशील, प्रयोगशील आणि महत्त्वाकांक्षी गुणांचा परिपोष त्यांच्या अंगी असल्यामुळेच त्या कोटीच्या कोटी उ•ाणे करू शकल्या. विज्ञान आणि संस्कृती यामध्ये समन्वय साधणारा त्यांचा दृष्टीकोन भारतीय वारसा जपणारा आहे.

अमेरिकेतील निवृत्त नौदल अधिकारी असलेली सुनी ऊर्फ सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेतील कमांडर म्हणून ओळखल्या जातात. फ्लाइट इंजिनियर, फ्लाइट कमांडर म्हणून त्यांचा अनुभव समृद्ध व संपन्न आहे. त्यांनी दोन वेळा आय.एस.एस. कमांडर म्हणून काम केले आहे. अमेरिकन नौदलात त्या कप्तानही होत्या. 608 दिवस 20 मिनिटे अंतराळात राहण्याचा त्यांनी केलेला विक्रम पुढे कोण मोडणार हा खरा प्रश्न आहे.

आध्यात्मिक बैठक?- सुनीता विल्यम्स वैज्ञानिक आहेत. पण विज्ञानाबरोबर त्यांची आध्यात्मिक बैठकसुद्धा लक्षणीय आहे. त्या जेथे जातात तेथे गणेश मूर्ती त्यांच्यासोबत असते. त्यांना या शुभ कार्यासाठी गणरायाचे अधिष्ठान प्रेरक ठरले. तसेच त्यांनी कर्मयोगाचा संदेश देणारी भगवद् गीता सुद्धा आपले आध्यात्मिक अधिष्ठान मानले आहे. सुनीता नेहमी थोडी भूक ठेवून जेवण करतात. म्हणजे त्या अल्पसंतुष्ट आहेत. त्यांच्या सोबत गीतेचे लघु भाषांतर असलेला एक मौलिक छोटा ग्रंथही असतो. अंतराळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी गीतेमधील चिंतन, विचारमंथन त्यांना सदैव मार्गदर्शक ठरते. या चमूला आता अनेक नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.

नवी संशोधन दृष्टी?- सुनीता विल्यम्स आणि त्यांचा चमू काही नव्या संशोधन समस्यांची उकल करणार आहेत. उदा. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा वनस्पतींच्या वाढीवर काय परिणाम होतो ते त्यांनी प्रयोगानी पाहिले आहे. अंतराळाच्या प्रणालीसाठी पृथ्वीवरील जमिनीच्या प्रणालींची तुलना केली जाते व तशा चाचण्या घेतल्या जातात. अंतराळातील संचार काळात मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, विविध रोगांशी अंतराळात पेशी कसा सामना करतात, तेथील वातावरणाचा आरोग्य संवर्धनासाठी काही फायदा होतो का यासारखे प्रश्न संशोधकासमोर आहेत. आजवर त्यांनी 14 ते 71 अशा विविध मोहिमात अग्रेसर राहून संचार केला. या कालावधीत त्यांनी 900 तासांहून अधिक काळ वैज्ञानिक संशोधनासाठी खर्ची घातला आहे. त्यावरून आपणास त्यांच्या संशोधनाची जिद्द, जिज्ञासा आणि बिजीगीशु वृत्ती दिसून येते. अनेकविध ज्ञानशाखेत संचार करून त्यांनी समस्यांच्या शृंखला जाणून त्यांची तेवढ्या भक्तीने उकलही केली आहे. त्यामुळे त्यांचा हा दौरा अद्वितीय व असामान्य नवा इतिहास घडविणारा मानला जात आहे. स्पेसवॉकचा विक्रम करण्यापासून बागकाम करण्यापर्यंत त्यांनी कितीतरी प्रयोग केले. तेथील बागकामात अॅडव्हान्स प्लॉट तयार केले. त्यामध्ये गडद लाल रोमेन लेटिव्हज्ची जोपासना केली. हॅबिटॅट 07 मधील प्रयोग अद्भुतच म्हटले पाहिजेत. बॅक्टेरिया आणि यीस्टवरील सूक्ष्म जीवांचा प्रभाव सुद्धा त्यांचा अभ्यास विषय आहे. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा जंतूंवर होणारा परिणाम अनेक समस्यांची उकल करण्यास मदत करू शकतो.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.