600 विकेट घेणारा सुनील नरेन पहिला गोलंदाज
वृत्तसंस्था/अबू धाबी
वेस्ट इंडीजचा गूढ स्पिनर सुनील नरेन त्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सुनील नरेनने स्पर्धात्मक टी-20 क्रिकेटमध्ये 600 बळी टिपणारा पहिला गोलंदाज बनून ऐतिहासिक यश मिळविले. त्याचे प्रँचायझी अबू धाबी नाईट रायडर्सकडून शारजाह वॉरियर्सविरुद्ध झालेल्या वर्ल्ड आयएल टी-20 सामन्यात खेळताना त्याने हा टप्पा गाठला. सामन्यांतर, अबू धाबी नाईट रायडर्सने नरेनला त्याच्या अभूतपूर्व कामगिरीचे स्मृतिचिन्ह म्हणून 600 क्रमांकाची विशेष जर्सी भेट दिली. त्रिनिदादच्या 37 वर्षीय क्रिकेटपटूने टॉम अबेलची विकेट घेऊन हा टप्पा गाठला.
ही कामगिरी नरेनला सर्वोत्तम टी-20 गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्याचा पुरावा आहे. गेल्या काही वर्षांत त्याने कोलकाता नाईट रायडर्स तसेच अबू धाबी नाईट रायडर्स, ट्रिनबागो नाईट रायडर्स आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘नाईट रायडर्स कुटुंबाला नरेनच्या असाधारण कामगिरीचा खूप अभिमान आहे, हा विक्रम क्रिकेटमधील सर्वात टिकाऊ माईलस्टोन म्हणून काळाच्या कसोटीवर उतरु शकेल,’ असे फँचायझीने त्याच्याबद्दल म्हटले आहे.