तालुक्यात रविवारची दुर्गामाता दौड ठरली अभूतपूर्व
दौडमध्ये तरुण-तरुणींचा सहभाग अधिक : जयघोषांनी परिसर दुमदुमला : गावागावांमध्ये सांस्कृतिक पारंपरिक देखाव्यांनी लक्ष वेधले
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात सुरू आहे. सध्या शाळांना सुटी आहे. तसेच रविवार हा कामगार वर्गासाठी सुटीचा दिवस असल्याने दुर्गामाता दौडमध्ये तरुण व तरुणींचा सहभाग अधिक दिसून आला. गावागावांमध्ये विविध सांस्कृतिक व ग्रामीण पारंपरिक देखावे सादर करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व विविध देवदेवतांच्या वेशभूषा या दौडमध्ये परिधान करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुर्गामाता दौडसाठी रविवार हा विशेष ठरला. बिजगर्णी गावात रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगुंदी विभागाच्या वतीने दुर्गामाता दौड काढण्यात आली. गावात सर्वत्र भगवे पताके लावण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले होते. तरुण व तरुणींनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे संपूर्ण गाव भगवेय बनले होते. रविवारी झालेली ही दौड लक्षणीय ठरली.
बिजगर्णी येथील दौड
बिजगर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या दौडला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, मनोहर बेळगावकर व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर शस्त्रपूजन ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचे पूजन गावातील विविध मंडळे व पतसंस्थांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राजमुद्रा पूजन, श्रीराम मूर्ती पूजन करण्यात आले. शंखनाद होऊन प्रेरणामंत्र झाल्यानंतर दुर्गामाता दौड मार्गस्थ झाली. यावेळी सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. स्वराज्य गल्ली, आंबेडकर गल्ली, मोरे गल्ली, हलकर्णीकर वाडा, ब्रह्मलिंग गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली या ठिकाणी दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दुर्गामाता दौंडमध्ये ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे सादर करण्यात आले होते. तसेच दौंडमध्ये प्रभू श्रीराम यांची मूर्ती उभारण्यात आली होती. संपूर्ण गावभर दौड फिरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या दौडची सांगता करण्यात आली.
मच्छेत रांगोळ्यांनी गल्ल्या सजल्या
मच्छे गावातील ब्रह्मलिंग मंदिर येथून दौंडला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय.... भवानी जय शिवाजी.. असा जयघोष या दौडमध्ये करण्यात आला. गावात दौडचे स्वागत करण्यासाठी आकर्षक अशा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. विविध देखावे या दौडच्या माध्यमातून सादर करण्यात आले.
पिरनवाडीत सजीव देखावे
पिरनवाडी येथील पाटील गल्लीतील गणपती मंदिर येथून रविवारी पहाटे दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. पाटील गल्ली, शिंदे मळा आदी ठिकाणी दौड काढण्यात आली. त्यानंतर दुर्गामाता मंदिर येथे या दौडची सांगता करण्यात आली. पाटील गल्लीमध्ये दळप कांडणे, भाजी विकणे, कंबळ शिवणे, चुलीवर भाकरी करणे, पाळणागीत म्हणणे असे देखावे सादर करण्यात आले होते.