For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रविवारची सुटी अन् ‘घरकुल’ची पर्वणी

11:28 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रविवारची सुटी अन् ‘घरकुल’ची पर्वणी
Advertisement

हजारोंच्या संख्येने प्रदर्शनाला उपस्थिती : हास्यकल्लोळ कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसविले

Advertisement

बेळगाव : घरकुलाकडे नेणारा स्वप्नमय प्रवास पाहण्याची संधी बेळगाव तसेच परिसरातील नागरिकांना घरकुल प्रदर्शनाने मिळत आहे. ‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल-2024’ हे प्रदर्शन बेळगावच्या सीपीएड मैदानावर भरविण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन आयोजित या प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी भेट दिली. विशेषत: रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे प्रदर्शनाला प्रचंड गर्दी झाली होती. घरकुल प्रदर्शनामध्ये यावर्षी 170 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत. घर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याने दररोज प्रतिसाद वाढत आहे. बिल्डिंग मटेरियलपासून इंटिरियर डिझाईन, बांधकामाचे साहित्य, सजावटीचे साहित्य, हार्डवेअर यासह असंख्य वस्तूंचा प्रदर्शनात सहभाग असल्याने बेळगावसह शेजारील महाराष्ट्र व गोव्यातून हजारो नागरिकांनी प्रदर्शनाला रविवारी भेट दिली. गर्दीने उच्चांक गाठल्याने स्टॉलवर उभे राहण्यासही जागा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले.

हास्यसम्राटाने पोट धरून हसविले

Advertisement

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर विरंगुळा म्हणून पोटभर हसण्याची संधी घरकुल प्रदर्शनाने मिळवून दिली. रविवारी महाराष्ट्राचे हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून उपस्थितांना खळखळून हसविले. सोलापूरची कानडीमिश्रीत मराठी, आकाशवाणीवरील निवेदकांचा आवाज ते थेट देशाच्या माजी पंतप्रधानांचा हुबेहुब आवाज काढून रसिकांना खिळवून ठेवले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या प्रत्येक विनोदाला भरभरून दाद दिली जात होती. रविवारी घरकुल प्रदर्शनाचे आयोजक ‘तरुण भारत’च्यावतीने प्रा. दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. पोतदार ब्रदर्स ज्वेलर्स, बीएससी टेक्स्टाईल मॉल, अॅप्टेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडमी व अणवेकर गोल्ड यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.

बीएससी टेक्स्टाईल मॉलचे पदाधिकारी अमजद जमादार, इराण्णा शिवशंकर, अणवेकर गोल्डचे मंजुनाथ अणवेकर, अॅप्टेक एव्हिएशनचे विनोद बामणे यांच्या हस्ते दीपक देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. भाषेमध्ये तसेच आवाजामध्ये बदल झाल्याने कसा विनोद होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई, इव्हेंट चेअरमन महेश अरबोळे, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जी. टी., इव्हेंट चेअरमन राहुल आंबेवाडी, ‘तरुण भारत’चे सीएमओ उदय खाडीलकर, प्रशासकीय व्यवस्थापक गिरीधर शंकर उपस्थित होते. संतोष गुरव यांच्या हार्मनी ऑर्केस्ट्रामुळे रसिकांना संगीत मैफल ऐकायला मिळाली. यावेळी मराठीसह हिंदी व कन्नड गीते सादर करण्यात आली. सूर निरागस हो, या गीताने मैफलीची सुरुवात झाली. यामध्ये जुन्या काळातील अजरामर गाणी सादर करण्यात आली. निवेदक विनायक बांदेकर यांनी आपल्या खुबीने हा कार्यक्रम अधिक रंगतदार केला. संगीताचा आस्वाद घेत नागरिकांनी फूड स्टॉलवरील खाद्य पदार्थांवर ताव मारला.

Advertisement
Tags :

.