सुनक यांना सोडावे लागणार विरोधी पक्ष नेतेपद
प्रीति पटेल पदाच्या शर्यतीत आघाडीवर : सुनक यांच्या पक्षांतर्गत विरोधक अशी ओळख
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टीत विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. ऋषी सुनक यांच्या स्थानी पक्षाची धुरा स्वत:च्या हाती घेण्यासाठी 6 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षात 31 ऑक्टोबर रेजी निवडणूक होणार असून त्याचा निकाल 2 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. कॉन्झर्वेटिक पार्टीला 4 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. यामुळे 14 वर्षांपासूनची सत्ता पक्षाला गमवावी लागली होती.
सुनक यांचे स्थान घेण्यासाठी भारतीय वंशाच्या नेत्या प्रीति पटेल देखील शर्यतीत आहेत. प्रीति पटेल यांच्यासमोर केमी बेडनॉच, रॉबर्ट जेनरिक, जेम्स क्लेवरली, टॉम टुगेन्डहाट आणि मेल स्ट्राइड यांचे आव्हान आहे.
बोरिस जॉन्सन यांच्या गटातील नेत्या
प्रीति पटेल या 2010 मध्ये पहिल्यांदा एसेक्सच्या विथेम येथून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. प्रीति पटेल या मूळच्या गुजराती आहेत. प्रीति पटेल यांना बोरिस जॉन्सन यांच्या गटातील नेत्या म्हणून ओळखले जाते. तर ऋषी सुनक यांच्या पक्षांतर्गत विरोधक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये पटेल या गृहमंत्री राहिल्या आहेत. इमिग्रेशन आणि कायदा-सुव्यवस्थेवरील स्वत:च्या कठोर भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. प्रीति पटेल यांना उजव्या विचारसरणीच्या मोठ्या हिस्स्याचे समर्थन प्राप्त आहे.
बेडेनॉच यांचे आव्हान
प्रीति पटेल यांच्यासोबत या शर्यतीत केमी बेडेनॉच या महिला नेत्याचा समावेश आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर लिज ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यासोबत बेडेनॉच देखील पंतप्रधान पदाच्या दावेदार होत्या. आता सुनक यांची जागा घेण्यासाठी बेडेनीच सट्टेबाजांच्या पसंतीच्या उमेदवार आहेत. त्या मूळच्या नायजेरियातील असून अमेरिकेत त्यांचे पालनपोषण झाले आहे.
पक्षात बदल इच्छिणारे जेनरिक
रॉबर्ट जेनरिक यांना 2021 मध्ये बोरिस जॉन्सन यांनी मंत्रिपदावरून हटविले होते. पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी कॉन्झर्वेटिक पार्टीत आमुलाग्र बदल करण्याची जेनरिक यांची मागणी आहे. उजव्या विचारसरणीचे समर्थक आणि मध्यममार्गी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विभागलेल्या पक्षाला एकजूट करण्याची क्षमता जेनरिक यांच्यात असल्याचे बोलले जाते.
जेम्स क्लेवरली यांचा दावा मजबूत
जेम्स क्लेवरली हे विदेशमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री राहिले आहेत. क्लेवरली यांना संवेदनशील मुद्दे हाताळण्याचा मोठा अनुभव आहे. क्लेवरली हे पक्षाला कट्टर विचारसरणीपासून दूर ठेवण्यात यावे या मागणीचे पक्षधर आहेत.
टुगेंडहटही मुख्य दावेदार
टॉम टुगेंडहट यांनी अफगाणिस्तान आणि इरामध्ये टेरिटोरियल आर्मीचे अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. अनेक वर्षांपासून त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानले जात राहिले आहेत. आता त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता होण्याची संधी आहे.
सुनक यांचे निकटवर्तीय मेल स्ट्राइड
मेल स्ट्राइड हे 2010 पासून कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे खासदार आहेत. ऋषी सुनक यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या दिग्गज नेत्या सुएला ब्रेव्हरमॅन यांनी विरोधी पक्षनेते पदासाठीची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. परंतु रिफॉर्म पार्टीचे नेते नाइजल फराज यांना पक्षात सामील करण्याची सूचना त्यांनी केली आहे.