महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सूर्य काही करत नाही...

06:38 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकदा देवाकडे सगळेच लोक, प्राणी, तक्रार घेऊन गेले. आम्ही सगळेजण रात्रंदिवस काही ना काहीतरी काम करत असतो. पण हा एकटा सूर्य असा आहे की तो काही काम करत नाही. सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, पूर्वेकडून येतो आणि पश्चिमेकडे निघून जातो. थंडीच्या दिवसात खूप धुकं म्हणून हा यायचं टाळतो आणि पावसाळ्यामध्ये पावसाळी ढग त्याला मागे ढकलून देतात. म्हणून येतच नाही. म्हणजे एकूण काय पूर्ण वर्षभराचं कामकाज पाहिलं तर सूर्य फार थोडे दिवस पूर्ण वेळ कामात असतो. हे सगळं ऐकल्यानंतर देवालासुद्धा प्रश्न  पडला. देव विचारात पडले. आता सूर्याच्याबाबतीत काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. शेवटी देवांनी सूर्याला शिक्षा केली....‘आठ दिवस तू पृथ्वीतलावर यायचं नाहीस’ सूर्य काहीही न बोलता शांतपणे निघून गेला. खूप लांब, खूप दूर. आता बाकी सगळेजण खुश झाले... बरं झालं, सूर्याला शिक्षा झाली. त्याला अशीच शिक्षा मिळायला हवी...असं म्हणत सगळेजण पृथ्वीवर परत आले. झाडे एकमेकांशी तावा तावाने बोलत होती. आम्ही 24 तास वर्षानुवर्ष या पृथ्वीवरती उभे असतो, ऊन वारा सोसत असतो, पानांचा, फळांचा, पक्षांचा, सगळ्यांचा भार आम्ही सोसत असतो. कोणी यावं, इथे घरटं बांधावं, कोणी यावं इथली पानं तोडून न्यावी, कोणी यावं फळं घेऊन जावं, आणि स्वत: ते विकून पैसे घ्यावे, पण आम्हाला मात्र काही यातलं मिळत नाही. आम्ही मात्र नुसते उभेच असतो आणि काम करत असतो. प्राणी पक्षीही असाच सूर लावून बोलत होते. या सूर्याला घरटं बांधायला नको, कुठे सकाळी दाणापाणी टिपायला जायला नको, पोरं बाळं वाढवायला नको की लांब उडत जायला नको. हा आपला नुसता उगवतो आणि मावळतो. याला खायला, प्यायला काही लागत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने त्या सूर्याशी बरोबरी करत होता. झालं ठरलेल्या शिक्षेनुसार सूर्यानं पांघरून अंगावरून घेतलं आणि शांत झोपी गेला. आता आठ दिवस त्याला काहीही काम करायचं नव्हतं. इकडे पृथ्वी वरती अंधाराचे साम्राज्य सुरू झालं. 24 तास फक्त अंधार... जगात अनेक लोक म्हणाले चला आता आपण झोपून घेऊ...वर्षानुवर्ष राहिलेली झोप आणि विश्रांती आता घ्यायला लागू, सगळेजण गाढ झोपी गेले. पण सगळ्यांना सवय असल्यामुळे सूर्योदयाच्या वेळेला त्यांना जाग आलीच. त्यांची चुळबूळ सुरू झाली. पण उजेडाचा काही पत्ता नव्हता. सूर्याची किरणे आलीच नव्हती. आता झोपलो तेव्हा या काळात अंधार आणि उजाडलं तेव्हाही काळा अंधार....विचित्रच झालं....मग एक दिवस जरा बरं वाटलं, पण दुसऱ्या दिवशी मात्र फारच गोंधळ सुरू झाला. झाडांच्या पानांमध्ये अन्न साठवायला सूर्याची किरणं नसल्यामुळे त्यांना काहीच करता येईना. ते जागच्या जागी वाळून जायला लागले. मधमाशांसाठी फुलांच्या पाकळ्याच उघडल्या नाहीत त्यांना मध कोण देणार? आणि काम कसं करणार? एका जागी बसून एका दिवसात त्या कंटाळून गेल्या....पक्षांनाही जाग आली नाही आणि दिसलेच नाहीत कारण उजेड नसल्यामुळे हे किडे बाहेर आलेच नाहीत. शेतातल्या पिकाला छोटी छोटी कणसं लागली होती पण सूर्यकिरणांशिवाय त्याची वाढच होणार नव्हती, त्याच्यात दाणे येणार कुठून? आणि पक्षांना दाणे मिळणार कुठून? झालं सगळ्यांचा एकमेकांवर त्रागा सुरु झाला. प्रत्येक जण एकमेकाला दोष देऊ लागला... आरडाओरडा करू लागला.. जंगली प्राण्यांना अंधारामुळे काहीच कळेच ना, ते आपले वेड्यासारखे धावतच सुटले, पळायला लागले, ओरडायला लागले, माणसाचंही  तेच झालं. शेवटी सगळेजण काकूळतीला आले....सगळ्यांनी जाऊन सूर्याचे पाय धरले ..माफी मागितली आणि सांगितलं नको बाबा झोपून राहूस, चल तिकडे पृथ्वीवरती. सूर्याने हसून सगळ्यांना माफ केलं आणि आपण नेमकं काय काय करतो याची यादी त्यांनी सुरू केली. पक्षांना, माणसांना, प्राण्यांना झोपेतून उठवतो. कामावर पाठवतो, जे उठत नाहीत काम करत नाहीत त्यांचे कसे हाल होतात ते आता तुम्हाला कळलं ना. म्हणजे त्यांच्या उठवण्यामध्ये माझा हात असतो. झाडांवर जी फळं फुलं येतात ना, ती फुलवण्यात मोठे करण्यात माझी साथ असते. मी आलो नाही तर कोणालाच अन्न बनवता येऊ शकणार नाही. अन्न बनलं नाही तर कोणी जिवंतच राहू शकणार नाहीत. म्हणून मी प्रत्यक्षात जरी तुम्हाला काम करताना दिसलो नाही तरी अप्रत्यक्षरीत्या ही सगळी कामं मीच घडवून आणत असतो. माझं फक्त आकाशात येणं महत्त्वाचं असतं. सूर्य स्वत: काही करत नसला तरी सूर्याशिवाय काहीच होऊ शकत नाही हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. सगळ्यांनी सूर्याचा जयजयकार केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article