पालकांना इस्पितळात सोडणाऱ्या मुलांवर ‘सुमोटो’
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचा आदेश : वृद्धांकडे दुर्लक्ष होत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश
बेंगळूर : मालमत्तेचे हस्तांतर करून पालकांना सरकारी इस्पितळांत सोडून जाणाऱ्या मुलांविरुद्ध सुमोटो दाखल करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने दिला आहे. त्यामुळे मालमत्ता आपल्या नावावर करून घेऊन पालकांना इस्पितळात सोडून जाणाऱ्या मुलांना दणका बसणार आहे. अलीकडे राज्यात वृद्ध पालकांना उपचाराच्या बहाण्याने सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असणाऱ्या इस्पितळांमध्ये दाखल केले जाते. उपचारानंतर पालकांना घरी न नेता त्यांना तेथेच सोडण्याचे प्रकार वाढत आहेत. वृद्धांच्या या व्यथा खात्याच्या प्रगती आढावा बैठकीवेळी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. मुले पालकांची मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेऊन त्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळांमध्ये सोडून जातात. बिकट आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून सांभाळ करणे शक्य नाही, सरकारी इस्पितळातच भोजन आणि राहण्याची मोफत व्यवस्था होते, असे सांगून मुले वृद्ध पालकांना तेथेच सोडून जात असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांच्या निदर्शनास आले आहे.
पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 ज्या कलम 23 नुसार, जर मुलांनी मालमत्ता वारसाहक्काने मिळाल्यानंतर पालकांकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांना सोडून दिले तर मृत्युपत्र किंवा मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्यासाठी, वृद्ध पालकांना मालमत्तेचे मालकी हक्क पुन्हा मिळविण्यासाठी दावा करता येतो. जर कोणताही पालक/ज्येष्ठ नागरिक दावा दाखल करण्यास असमर्थ असेल तर सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणी केलेली कोणतीही स्वयंसेवी संघटना वा संस्था त्यांच्यावतीने दावा दाखल करू शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने किती प्रकरणे दाखल केली गेली आहेत, याचा तपशील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याचे आणि अशा प्रकरणांमध्ये सुमोटो नोंदविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. सरकारी इस्पितळांमध्ये अशी प्रकरणे आढळून आल्यास वृद्धांच्या मुलांविरोधात गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.