खादरवाडी कुस्ती मैदानात अमोल नरळे, प्रेम पाटील, करण पिंगट, ओंमकार पिंगट यांचे प्रेक्षणिय विजय
बेळगाव : खादरवाडी येथील जय हनुमान तालिम कुस्तीगीर संघटना व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन सांगलीच्या प्रशांत शिंदेने कुमार भारत केसरी सुमीत कुमार हरियानाला अवघ्या 4 मिनीटात दोन्ही हाताचे हप्ते भरून ढाकेवरती आसमान दाखवून उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली तर खादरवाडीच्या करण पिंगट, ओंमकार पिंगट, प्रणव खादरवाडी,चेतन येळ्ळूर तर महिला गटात प्रभा खादरवाडी यानी गदेच्या कुस्तीत विजय संपादन करून गदेचे मानकरी ठरले. प्रमूख कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भोसले व्यायाम शाळा सांगलीचा प्रशांत शिंदे व कुमार भारत केसरी सुमीत कुमार हरियाना ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्या मिनीटाला सुमीत कुमार हरियानाने पायाला आकडी लावत प्रशांत शिंदेवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण खालून किल्ली तोडत प्रशांत शिंदेने सुटका करून घेतली. दुसऱ्या मिनिटाला सुमीत कुमार हरियानाने दुहेरीपट उपसून प्रशांत शिंदेवर कब्जा मिळविले. पण प्रशांत शिंदे खालू डंकी मारत सुटका करून घेतली चौथ्या मिनिटाला प्रशांत शिंदेने एकेरीपट काढून सुमीत कुमारला खाली घेतले. पण सुमीतने खालून किल्ली तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना प्रशांत शिंदेने दोन्ही हाताचे हप्ते भरून ढाकेवरती आसमान दाखवून उपस्थित कुस्ती शोकीनांची मने जेंकली. दुसऱ्या क्रमाकांची कुस्ती कामेश पाटील कंग्राळी व महाराष्ट्र चॅम्पियन मनोज कदम यांच्यात देवस्थान कमिटी यांच्याहस्ते लावण्यात आली. या कुस्तीत कामेश पाटीलने तिसऱ्या मिनिटाला पायाला आकडी लावून मनोजवर कब्जा मिळविला. यावेळी कामेशने हाताला सांड मारून फिरविण्याचा प्रयत्न करीत असता. मनोज कदमला हाताला गंभीर दुखापत झाल्याने कामेश पाटील कंग्राळीला विजय घोषित करण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बेळगावचा उगवता मल्ल किर्तीकुमार बेनके-कार्वे व भोसले व्यायाम शाळा अमोल नरळे ही कुस्ती खादरवाडी शेतकरी संघटना यांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्या मिनिटाला किर्तीकुमार कार्वेने एकेरीपट काढत अमोल नरळेला खाली घेत चित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून नरळेने सुटका करून घेतले. तिसऱ्या मिनिटाला अमोल नरळेने एकेरीपट काढीत किर्तीकुमार बेनकेवर कब्जा मिळवित घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला पण त्यातून सावरून किर्तीकुमार खालून डंकी मारून सुटण्याचा प्रयत्न करत असताना अमोल नरळेने नवदल घिश्यावर कार्वेला चारीमुंड्या चित करून उपस्थित कुस्ती शौकींनाची वावा मिळविली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे राज्य अध्यक्ष किरण गावडे, सचिव विश्वनाथ पाटील व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रेम पाटील कंग्राळी व सचिन नरे निपाणी यांच्यात लावण्यात आले. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला प्रेम पाटीलने एकेरीपट काढून सचिन नरेवर कब्जा मिळवित घिस्सा मारण्याचा प्रयत्न करत असताना खालून डंकी मारून किल्ली तोडून जाताना प्रेम पाटीलने एकचाक डावावरती सचिन नरेवर प्रेक्षणीय विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत यल्लाप्पा नेरवानट्टी याने मोहन निपाणीचा 7 व्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावरती विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज व विनायक यळ्ळूर डाव प्रतिडावाने झुंजली. वेळेअभावी ही कुस्ती गुणावरती घेण्याचा निर्णय पंचानी घेतला. त्यामध्ये यल्लाप्पा निर्वारनट्टीने एकेरीपट काढून गुण मिळवित विजय संपादन केला.
सातव्या क्रमांकाच्या कुस्ती बबलू नरळेने बाळू शिंदे कुरबेटच्या घिस्सा डावावर पराभव केला. आठव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम तुर्केवाडी व निरंजन येळ्ळूर ही कुस्ती डाव प्रतिडावाने झाली वेळेअभावी बरोबरीत राहिले. नव्या क्रमांकाच्या कुस्ती निशांत राशीवडेने बक्शु दर्गाचा निकाल डावावरती पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्ती महादेव दरण्णावरला विजय घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे किसन कंग्राळीने निकालवर, शुभम पाटील-तेऊरवाडीने घुटण्यावर, अनिल धारवाडने बॅकथ्रोवर, निखिल कंग्राळीने घुटण्यावर, अमोल बंबरग्याने लपेटवर, मनोज खादरवाडीने एकलांगीवर आपल्या प्रतिस्पर्धांवर विजय मिळविले. तर ओंमकार संतीबस्तवाड, ओंमकार खादरवाडी, ज्ञानेश्वर मजगाव, ओंम घाडी, सुहास खादरवाडी, गणेश खादरवाडी, शंभू शिंदोळी, प्रताप खादरवाडी, प्रथमेश शिन्नोळी, हर्ष कंग्राळी, कुणाल येळ्ळूर, किरण इटगी, प्रणव उचगाव, प्रशांत पाटील, शुभम हट्टीकर यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात केले. गद्यांच्या कुस्तीत महेश तिर्थकुंडेने गणेश मलतवाडीचा घिस्सा डावावरती दुसऱ्या गदेच्या कुस्तीत किरण पिंगट खादरवाडीने, राहुल पाटील कोल्हापुरचा निकाल डावावर तिसऱ्या गदेच्या कुस्तीत ओंमकार पिंगट खादरवाडी राहुल माचीगडचा लपेट डावावरती तर महिलांच्या गदेच्या कुस्तीत प्रभा खादरवाडीने श्रावणी आंबेवाडीचा ढाकेवर पराभव करून या सर्वांनी गदेचे मानकरी ठरले.
मेंढ्याच्या कुस्ती प्रज्वल मच्छेने श्रवण कडोलीचा बॅकथ्रो डावावरती पराभव करून मेंढ्याचे बक्षिस मिळविले. महिलांच्या कुस्तीत 1 नंबरच्या कुस्ती मैदानात कल्याणी वाघवडेने राधिका अनगेळवर घिस्सा डावावरती पराभव केला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शितल खादरवाडीने जान्हवी किणयेचा एकलांगी डावावर विजय मिळविला. भक्ती गावडे राणी उचगावचा लपेट डावावरती, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रांजल अनगोळ सुष्मा खादरवाडीचा एकचाक डावावर, पाचव्या क्रमांकाची कुस्ती श्रृती खादरवाडीने श्रावणी टिळकवाडीच्या घिस्यावर, सहाव्या क्रमांकाची कुस्ती संतीबस्तवाडने श्रेया शिवनगेकर झोळी डावात, सातव्या क्रमांकाची कुस्ती श्रेया खादरवाडीने सुष्मिता संतीबस्तवाडवर मुगळी डावावर, आठव्या क्रमांकाच्या कुस्ती आराध्या येळ्ळूरने समीक्षा खानापूवर झोळी डावावर तर नव्या क्रमांकाच्या कुस्ती ऋतुजा वडगावने तनुजा खानापूरवर घिस्सा डावावर पराभव केले. आकर्षक कुस्तीत प्रणव खादरवाडीने प्रथमेश येळ्ळूरचा बांगडी डावावरती तर चेतन येळ्ळूरने निखिल कोल्हापूरने एकचाक डावावरती पराभव करून विजय संपादन केले. कुस्तीचे पंच म्हणून अतुल शिरोळे, सुधीर बिर्जे, बाळाराम पाटील, सुरेश पाटील, ए. जी. मंतुरगे, महेश हुंदरे, पिराजी मुंचडीकर, नारायण मुचंडीकर, राजीव मजगावी, मारूती घाडी, दुर्गेश नाईक, नारायण नेसरकर, अप्पाजी, बेनाप्पा काकतीकर आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचक कृष्णकांत चौगुले राशिवडे यांनी कुस्तीच्या शैलीत व परंपरेची आठवण करून दिली. तर यळगुडच्या रवी आवटेने उपस्थित कुस्ती शौकींनांना आपल्या रनालगीच्या तालावर कुस्ती शौकींनाना खिळवून ठेवले. प्रारंभी कुस्तीगीर संघटनेच्या हस्ते आखाड्याचे पुजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खादरवाडीचे पैलवान पिंगट व शिवाजी चिंगळे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. खादरवाडी गावात 48 वर्षानंतर मैदान भरविण्यात आले.