For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्हाची झळ..वाढलेला कर..जनतेला असह्या..!

12:41 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
उन्हाची झळ  वाढलेला कर  जनतेला असह्या
Advertisement

घरपट्टीसाठी मनपाच्या कार्यालयात झुंबड : ज्येष्ठ नागरिकांतून नाराजी

Advertisement

बेळगाव : बेळगावची जनता उष्म्याने हैराण झाली असतानाच घरपट्टी भरण्याचे चलन घेण्यासाठी दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे. यामुळे बेळगावच्या जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे घरपट्टी तसेच खुल्या जागेच्या करामध्ये भरमसाट वाढ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात लांबच्यालांब रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे वृद्धांना त्याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा तिढा सोडवावा, अशी मागणी होत आहे. एप्रिल अखेरपर्यंत घरपट्टी भरल्यास 5 टक्के सवलत मिळते. त्या आशेने ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहून घरपट्टी भरत आहेत. सकाळी 9 वाजताच विभागीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक हजर होत आहेत. त्यानंतर 10 वाजता कामकाजाला सुरुवात केली जात आहे. बेळगाव वनमध्ये भरायचे असेल तर. महानगरपालिकेकडून चलन घेवून या, असे सांगितले जात आहे. तर चलन आणण्यासाठी  रांगेत उभे रहावे लागत आहे.

ऑनलाईनव्दारे घरपट्टी भरण्यास सुविधा उपलब्ध करण्यात आली तरी विविध कारणाने ऑनलाईन घरपट्टी भरणे अशक्य झाले आहे. सर्व्हर डाऊनची समस्या नेहमीचीच आहे. यातच महानगरपालिकेचे वेबसाईट बंदच आहे. बुधवारी त्याची दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत होते. मात्र अजूनही अर्धातास उत्तर दिले जात होते. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी रांगेतच उभे रहावे लागत आहे. घरपट्टी बरोबरच खुल्या जागेच्या करामध्ये भरमसाट वाढ करण्यात आली आहे. ती वाढ पाहता बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक कर न भरताच माघारी फिरत आहेत. घरपट्टीमध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण काही जणांची घरपट्टी दुपटीपेक्षाही अधिक वाढविली आहे. खुल्या जागांचा कर तीन ते चार पट्टीने वाढला आहे. याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता 2004 पासून खुल्याजागांचा कर वाढविण्यात आला नव्हता. त्यामध्ये ही अधिक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण अचानकपणे इतक्या प्रमाणात कर वाढविल्यामुळे जनतेला मोठा भुर्दंड बसत असून सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

पाच ते सहा चलन घेवून रांगेत

नेहमी प्रमाणे आम्ही सकाळी 10 वाजता कार्यालयात हजर राहतो. त्यानंतर कामकाजाला सुरूवात केली जाते. मात्र काही जण रांगेमध्ये थांबलेले पाच ते सहा चलन घेवून येतात. त्यामुळे त्यांचा कर भरण्यास बराचविलंब लागत आहे. परिणामी थांबलेल्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तेंव्हा एका व्यक्तीने केवळ एक किंव दोन चलना व्यतिरिक्त अधिक चलन घेवून रांगेत थांबू नये, असे आवाहन कोनवाळ गल्ली येथील मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे.

घरपट्टीसाठी सकाळीच रांगेत

एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरली तर पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही सकाळीच रांगेत थांबलो आहे. मात्र काही जण राजकीय व्यक्तींचा मी माणूस आहे म्हणून थेट कार्यालयात जात आहेत. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करत घरपट्टी भरण्याचे चलन काढून घेतले जात आहे, असा आरोप त्यांनी केले.

-दीपक इंगवले

तीन दिवस फेऱ्या

घरपट्टी किती आहे? त्याचे चलन घेण्यासाठी गेले तीन दिवस मी या ठिकाणी येत आहे. मात्र गर्दी पाहून थांबणे अशक्य झाले आहे. शेवटी बुधवारी सकाळी 8.45 वाजता रांगेत उभे आहे. आता चलन घेवून त्यानंतर मी घरपट्टी भरणार असल्याचे ते म्हणाले.

-संजय तांबुळगुंड

वृद्धांना करावी लागतेय कसरत

घरपट्टी भरलीच पाहिजे. एप्रिलमध्ये भरली तर सवलत मिळते. त्यामुळे दरवर्षी आम्ही एप्रिलमध्येच घरपट्टी भरत असतो. त्यासाठी चलन आवश्यक आहे. ते चलन घेण्यासाठी मी येथे आले आहे. मात्र येथील गर्दी पाहता वृद्धांना त्याचा अधिक त्रास होत आहे. एक तर उन्हाच्या झळा त्यातच गर्दी त्यामुळे जीव कासाविस होत असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

-लिलावती गाडवी

Advertisement
Tags :

.