श्रीगणेशगीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा सारांश - भाग 1
अध्यायाच्या सुरवातीला राजा वरेण्याने बाप्पांना विनंती केली की, तुम्ही मला ज्ञानयोग व कर्मयोग असे दोन योग सांगितलेत त्यापैकी माझ्यासाठी कोणता योग श्रेयस्कर आहे ते कृपया सांगा.
उत्तरादाखल बाप्पा म्हणाले, तुझा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतोय. दोन्ही मार्गाचे स्वरूप, क्षेत्र, अधिकारी व साधना वेगवेगळे असल्या तरी दोन्ही मार्ग एकमेकांना सहाय्यकारी आहेत. कसे ते सांगतो. माणसाने त्याच्या वाट्याला आलेले कर्म हे केलेच पाहिजे कारण कर्माचा त्याग करून काहीच साध्य होणार नाही. त्याने जरी असं ठरवलं की मी काही काम करणार नाही तर ते शक्य होणार नाही. कारण असा निर्णय घ्यायला मनुष्य स्वतंत्र नसून त्याच्या स्वभावात असलेले त्रिगुण त्याच्याकडून काम करून घेतातच. समजा एखाद्याने इंद्रियांना बळजबरीने गप्प बसवले तरी त्याच्या मनात विषयांचे चिंतन चालूच असते. हे सगळ्यात घातक होय. म्हणून माणसाने प्रथम इंद्रियांवर ताबा मिळवावा. कोणतीही अपेक्षा न ठेवता योग्य ते कर्म करणारा कर्मयोगी श्रेष्ठ असतो. मी कर्म करणार नाही असे म्हणून गप्प बसणाऱ्यापेक्षा निरपेक्षतेने कर्म करणारा श्रेष्ठ ठरतो. काहीच कर्म जर केले नाही तर त्याला जेवाखायलासुद्धा मिळणार नाही. लोक कर्म करून पापपुण्याची गाठोडी जमा करतात आणि त्याचा भोग घेण्यासाठी पुन्हा जन्माला येतात. म्हणून त्यांनी कर्म करून मला अर्पण केले तर ते बंधनात सापडणार नाहीत. समाजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून मी वर्णव्यवस्था निर्माण करून प्रत्येकाला कर्मे नेमून दिली परंतु हे न ओळखता माणसे त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे भेदाभेद करत बसली. तुम्ही कर्म करत गेलात की, देव संतुष्ट होतील आणि तुम्हाला हवे ते देतील अशा पद्धतीने वागत गेल्यास उभयतांना संतोष होईल. देवांनी तुम्हाला दिलेले स्वत:च न उपभोगता त्यातील काही भाग देवांना अर्पण करा. जे केवळ स्वत:च त्याचा उपभोग घेतात ते पापच भक्षण करतात असे म्हंटले तरी चालेल. निरपेक्ष कर्मातून अन्नसाखळी व्यवस्थित चालून पाऊस वेळेवर पडतो. पावसापासून अन्नाची निर्मिती होते. अन्नापासून भूतमात्र उत्पन्न होतात. ही अन्नसाखळी तोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. वेद मी निर्माण केले. वेदात कर्माचे वर्णन आलेले आहे म्हणजे प्रत्येक कर्मात मी आहेच. हे सर्व लक्षात घेऊन कर्म करून ते मला अर्पण करणे हे श्रेयस्कर आहे हे तुझ्या लक्षात आले असेलच.
कर्मयोगाबद्दल सांगितल्यानंतर बाप्पा आता ज्ञानयोगाचे महात्म्य सांगत आहेत. ते म्हणाले, राजा मी सांगितल्याप्रमाणे मनुष्य कर्मयोगाचे आचरण करू लागून त्यात मुरला की, त्याच्या हे लक्षात येते की कर्म करून ईश्वराला अर्पण करायचे असल्याने तो करत असलेल्या कर्मातून स्वत:साठी काहीही मिळवायचे नाहीये. एकदा हे लक्षात आले की तो कर्म करून मोकळा होतो आणि उर्वरित वेळेत आत्मचिंतनाकडे त्याचे लक्ष आपोआपच लागते. कर्म करत असताना त्याला माझी आठवण येतच असते. असे होत राहिले की, कर्म झाल्यावर त्याला माझी आठवण येतच राहते. त्यातून तो माझ्याबद्दल विचार करत राहतो. ह्या अशा चिंतनातूनच उपनिषदांची निर्मिती झाली आहे. म्हणून माणसाने कोणत्याही अपेक्षेशिवाय कर्मे करावीत म्हणजे सरतेशेवटी त्याला माझी प्राप्ती होते. कर्मयोग आचरत असताना ज्ञानयोगाचे आचरण मनुष्य कधी करू लागतो हे त्याचे त्यालासुद्धा उमगत नाही. असे ज्ञानयोगी त्यांच्या आयुष्याचा उर्वरित काळ लोकसंग्रहासाठी खर्च करतात. ते लोकांना एकत्र जमवतात, त्यांना त्यांच्यातील क्रीयाशक्तीची जाणीव करून देतात आणि त्यांच्याकडून समजोपयोगी मोठमोठी कार्ये करून घेतात. त्याचे हे वागणे बघून इतर लोक त्याचे अनुकरण करतात.
क्रमश: