सुमितने राखले भालाफेकीतील विश्वविजेतेपद
टी. मरियप्पन, एकता बयान यांना सुवर्णपदके
वृत्तसंस्था/ कोबे (जपान)
येथे सुरु असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा पॅरा अॅथलिट आणि विद्यमान विश्वविजेता भारताचा सुमित अँटिलने एफ 64 भालाफेक प्रकारात विश्वविजेतेपद राखले. तसेच भारताच्या टी. मरियप्पन आणि एकता बयान यांनीही आपल्या गटात सुवर्णपदके मिळविली. या कामगिरीमुळे भारताने स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पदक तक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. भारताने एकूण 10 पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्यपदके मिळविली आहेत. ब्राझीलचा सं
घ 14 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानावर असून चीनचा संघ 15 सुवर्ण, 13 रौ
प्य आणि 13 कांस्यपदकांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताचा 25 वर्षीय अॅथलिट सुमित अँटिलने 2023 च्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तसेच टोकिया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली होती. जपानमधील या स्पर्धेत त्याने 69.50 मी. चा भालाफेक करत सुवर्णपदक व विश्वविजेतेपद स्वत:कडे राखले. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत सुमित अँटिलने एफ 64 भालाफेक प्रकारात 70.83 मी. चा विश्वविक्रम नोंदविला होता. तसेच 2023 च्या पॅरिस येथे झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या क्रीडा प्रकारात भारताच्या संदीपने 60.41 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक तर लंकेच्या दुलेन कोडीथुवेकूने 66.49 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक घेतले.
भारताचा आणखी एक पॅरा अॅथलिट टी. मरियप्पनने टी-63 उंच उडीमध्ये 1.88 मी. चे अंतर नोंदवित स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. गेल्या 8 वर्षांच्या कालावधीत प्रमुख स्पर्धेतील मरियप्पनचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 28 वर्षीय मरियप्पनने 2016 च्या रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत टी-42 उंच उडी प्रकारात सुवर्णपदक तर 2021 च्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने टी-63 प्रकारात रौप्यपदक तसेच गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत त्याने टी-63 विभागात रौप्यपदक मिळविले होते. या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या फ्रेचने रौप्यपदक तर सॅम ग्रीवेने कांस्यपदक मिळविले होते.
महिलांच्या एफ-51 लाठीफेक (क्लब थ्रो) प्रकारात भारताची पहिला पॅरा अॅथलिट एकता बयाणने 20.12 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. 2024 च्या अॅथलेटिक्स हंगामातील एकताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेमध्ये महिलांच्या 400 मी. टी-20 विभागात भारताच्या दिप्ती जिवनजीने सोमवारी सुवर्णपदक मिळविले होते. एफ-51 क्लब थ्रो प्रकारात काशिश लाक्राने 14.56 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक तर अल्झेरियाच्या निडेट बुचरेफने 12.70 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले. 2018 च्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत एकताने सुवर्णपदक मिळविले होते. 38 वर्षीय एकता ही हरियाणा शासनाच्या सेवेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सदर जपानमधील ही स्पर्धा 25 मेपर्यंत चालणार आहे.