सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धा आजपासून
भारताची सलामी आज इंग्लंडशी
वृत्तसंस्था/जोहोर बेहरु (मलेशिया)
2025 च्या हॉकी हंगामातील सुलताना ऑफ जोहोर चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा येथे शनिवारपासून सुरू होणार आहे. पी.आर.श्रीजेशच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघ या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला असून त्यांचा सलामीचा सामना शनिवारी इंग्लंडबरोबर होत आहे. यापूवीं झालेल्या सुलतान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकाविले होते. दरम्यान चेन्नई आणि मधुराई येथे 28 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्व चषक कनिष्ठांच्या हॉकी स्पर्धेपूर्वी भारतीय हॉकीपटूंची चाचणी या स्पर्धेद्वारे होईल.
आगामी विश्वचषक कनिष्ठांच्या हॉकी स्पर्धेत 24 संघांचा समावेश आहे. सुलतान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धा ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघातील यापूर्वीचे ज्येष्ठ हॉकीपटू यावेळी या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. आता त्यांच्या ठिकाणी नवोदितांना संधी मिळाली आहे, असे प्रशिक्षक श्रीजेशने म्हटले आहे. भारतीय हॉकी संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार बनविण्याचे स्वप्न पी.आर.श्रीजेशने बाळगले आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय हॉकी संघ समतोल असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय हॉकी संघ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत ब्रिटनने चारवेळा ही स्पर्धा जिंकली असून भारताने 2013, 2014 आणि 2022 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 11 ऑक्टोबरला इंग्लंडबरोबर होणार आहे.