सुलतान जोहोर चषक हॉकी : भारताला कांस्य
न्यूझीलंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 फरकाने मात
वृत्तसंस्था/जोहोर बहरू, मलेशिया
भारताच्या युवा हॉकी संघाने येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडचा रोमांचक शूटआऊटमध्ये पराभव करून कांस्यपदक पटकावले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी साधली होती. पण नंतर झालेल्या शूटआऊटमध्ये भारताने 3-2 असा विजय मिळविला. भारताचा गोलरक्षक बिक्रमजित सिंगने शानदार गोलरक्षण करीत पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन फटके अचूक थोपविल्याने तोच भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारतातर्फे गुरज्योत सिंग, मनमीत सिंग, सौरभ आनंद कुशवाहा यांनी शूटआऊटमध्ये गोल नोंदवले. त्याआधी निर्धारित वेळेत दिलराज सिंगने 11 व्या मिनिटाला व मनमीत सिंगने 20 व्या मिनिटाला भारताचे गोल केले होते. भारताची ही आघाडी न्यूझीलंडने शेवटच्या सत्रात कमी केली. ओवेन ब्राऊनने 51 व्या व जाँटी एल्मेसने 57 व्या मिनिटाला गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली.
भारताने नियोजनबद्ध आक्रमणास प्रारंभापासून सुरुवात केली. जलद व शॉर्ट पासेस आणि कौशल्यपूर्ण ड्रिबलिंग करण्याचे लाभ त्यांना 11 व्या मिनिटाला मिळाला. दिलराजने मुकेश टोपोच्या साथीने गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात अनमोल एक्का, चंदन यादव, अर्शदीप सिंग यांनी आक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्यांचे प्रयत्न थोडक्यात कमी पडले. दिलराजने मात्र अकराव्या मिनिटाला भारताला आघाडीवर नेले.
दुसऱ्या सत्रातही भारताने नियंत्रण कायम राखले. भक्कम बचाव करीत त्यांनी न्यूझीलंडच्या आघाडीवीरांना संधीच निर्माण करू दिली नाही. 19 व्या मिनिटाला बचावातील त्रुटीचा लाभ न्यूझीलंडला मिळाल्याने त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारतीय बचावफळीने भक्कम बचाव करीत लागोपाठ मिळालेले दोन पेनल्टी कॉर्नर्स थोपवण्यात यश मिळविले. पुढच्याच मिनिटाला अनमोल, मनमीत, मुकेश यांचे जबरदस्त स्टिकवर्क व टीमवर्कमुळे भारताला शानदार मैदानी गोल नोंदवता आला. 2-0 अशा आघाडीने भारताला मजबूत स्थिती प्राप्त झाली. मध्यंतराआधी अनेक संधी निर्माण केल्या तरी त्यांना ही आघाडी आणखी वाढवता आली नाही.
तिसऱ्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. पण चौथ्या सत्रात न्यूझीलंडने मुसंडी मारत भारताशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. त्यामुळे भारताचे कांस्यपदक अडचणीत आले होते. 51 व्या मिनिटाला ब्रॅडली रॉथवेलच्या मदतीने ओवेन ब्राऊनने उजव्या बगलेतून मिळालेल्या क्रॉस पासला टॅप करीत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. बरोबरीसाठी प्रयत्न करणाऱ्या न्यूझीलंडने 57 व्या मिनिटाला दुसरे यश मिळविले. आधीच्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या जाँटी एल्मेसने मैदानी गोल करीत बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांनी अखेरच्या क्षणात काही पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण एकावरही गोल झाला नाही.