For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी.गुकेश, मनू भाकरसह चौघांना खेलरत्न

06:10 AM Jan 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
डी गुकेश  मनू भाकरसह चौघांना खेलरत्न
Advertisement

महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारीला अर्जुन पुरस्कार : मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव तर दीपाली देशपांडे द्रोणाचार्य पुरस्काराच्या मानकरी : 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, मुंबई

भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची घोषणा केली आहे. बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार या चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मी रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्नील कुसाळेलाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, स्वप्नीलच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Advertisement

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 2 जानेवारी रोजी खेलरत्ना व अर्जुन पुरस्काराची घोषणा केली. क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येईल.

डी. गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण कुमार, मनू भाकरला सर्वोच्च सन्मान

समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारने मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलिट प्रवीण कुमार यांना खेलरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मनू भाकरचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केले नव्हते, त्यामुळे वाद झाला होता. पण गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये मनूला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2 पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळाले. पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट असलेल्या हरमनप्रीतला आपल्या तगड्या कामगिरीसाठी सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते. प्रवीण कुमारने पॅरालिम्पिकच्या टी 64 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. टी 64 वर्गीकरण गुडघ्याखाली एक किंवा दोन पाय गमावलेल्या खेळाडूंसाठी आहे.

क्रिकेटमध्ये कोणालाच पुरस्कार नाही

गुरुवारी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारांची यादी जाहीर केली. पण, या पुरस्काराच्या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. याचबरोबर प्रशिक्षकाच्या श्रेणीतही क्रिकेट संबधित कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही, हे उल्लेखनीय आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

गुकेश डी (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंह (हॉकी), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स) मनू भाकर (नेमबाजी).

अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू

स्वप्नील कुसाळे (शूटिंग), सचिन खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स), ज्योती याराजी (अॅथलेटिक्स), अन्नू राणी (अॅथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), स्वीटी बोरा (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत सिंह (हॉकी), राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी), प्रीती पाल (पॅराअॅथलेटिक्स), जीवनजी दीप्ती (पॅरा  अॅथलेटिक्स), अजित सिंह (पॅराअॅथलेटिक्स), धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स), प्रणव सूरमा (पॅरा अॅथलेटिक्स), एच होकातो सेमा (पॅराअॅथलेटिक्स), सिमरन (पॅरा अॅथलेटिक्स), नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स), नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन), सुश्री तुलसीमथी मुरुगेसन (पॅराबॅडमिंटन), नित्या सिवन (पॅरा बॅडमिंटन), मनिषा रामदास (पॅरा बॅडमिंटन), कपिल परमार (पॅरा जुडो), मोना अग्रवाल (पॅराशूटिंग), रुबिना फ्रान्सिस (पॅराशूटिंग), सरबज्योत सिंह (शूटिंग), अभय सिंह (स्क्वॅश), साजन प्रकाश (स्विमिंग), अमन सेहरावत (कुस्ती).

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन)

  • मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा स्विमींग), सुचा सिंह (अॅथलेटिक्स)
  • उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन)
  • एस.मुरलीधरन (बॅडमिंटन) व अरमांडो कोलाको (फुटबॉल).
  • उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार : सुभाष राणा (पॅरा शूटिंग), दीपाली देशपांडे (शूटिंग), संदीप सांगवान (हॉकी).

कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे,सांगलीचा सचिन खिलारीला अर्जुन पुरस्कार

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारांची घोषणा केली. विशेष म्हणजे, स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला ऐतिहासिक असे कांस्यपदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीने तब्बल 72 वर्षानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश आले. स्वप्नीला हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील रहिवासी आहे. याशिवाय, पॅरालिम्पिकमध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या सचिन खिलारीने गोळाफेकीच्या एफ 46 प्रकारात रौप्यपदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या या दोन्ही सुपुत्रांचा राष्ट्रपती भवनामध्ये अर्जुन पुरस्काराने 17 जानेवारी रोजी गौरव करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.