सुळेभावी महालक्ष्मी यात्रेला आजपासून प्रारंभ
यात्रोत्सवाची जय्यत तयारी : जीर्णोद्धार कमिटी पदाधिकाऱ्यांची माहिती
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुळेभावी येथील ग्रामदेवी महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव यावर्षी होणार आहे. यानिमित्त मंगळवार दि. 18 ते बुधवार दि. 26 या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटीच्यावतीने करण्यात आली असून भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष देवण्णा बंगेन्नवर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. दर पाच वर्षांनी महालक्ष्मी देवीची यात्रा भरविली जाते. यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होणार असून गावामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवार दि. 18 रोजी बडिगेर यांच्या घरामध्ये देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल. मंगळवारी रात्री व बुधवार दि. 19 रोजी सकाळी गावातून देवीची मिरवणूक काढली जाणार आहे. गुरुवार दि. 20 ते 26 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.