For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुळेभावी महालक्ष्मी यात्रेला आजपासून प्रारंभ

11:36 AM Mar 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुळेभावी महालक्ष्मी यात्रेला आजपासून प्रारंभ
Advertisement

यात्रोत्सवाची जय्यत तयारी : जीर्णोद्धार कमिटी पदाधिकाऱ्यांची माहिती

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुळेभावी येथील ग्रामदेवी महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव यावर्षी होणार आहे. यानिमित्त मंगळवार दि. 18 ते बुधवार दि. 26 या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटीच्यावतीने करण्यात आली असून भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष देवण्णा बंगेन्नवर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. दर पाच वर्षांनी महालक्ष्मी देवीची यात्रा भरविली जाते. यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होणार असून गावामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवार दि. 18 रोजी बडिगेर यांच्या घरामध्ये देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल. मंगळवारी रात्री व बुधवार दि. 19 रोजी सकाळी गावातून देवीची मिरवणूक काढली जाणार आहे. गुरुवार दि. 20 ते 26 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये मैदानी खेळ, शाहिरी पोवाडे, भजन यासह इतर विनोदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. 21 रोजी देवीला गाऱ्हाणे घालणे व ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. 26 रोजी यात्रोत्सवाची सांगता रात्री 10 वा. धार्मिक विधींनी होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी बेळगावमधून थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये कुठेही बॅनर लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. बॅनर अथवा कटआऊटमुळे गावचे सौंदर्य बिघडू नये, यासाठी परवानगी देण्यात आली नाही. डीजेला फाटा देत स्थानिक वाद्यांचा समावेश करण्यात आला असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा. यात्रा यावर्षी पूर्णत: शाकाहारी असून गावाने नवीन आदर्श निर्माण केल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी बसनगौडा पाटील, अण्णाप्पा पाटील, शशिकांत संगोळी, भैरू कांबळे, भीमशी पुजेरी, राम पुजेरी यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.