सुकमा राममंदीर 21 वर्षांनंतर ‘मुक्त’
माओवाद्यांची भीती झुगारुन प्रशासनाचा निर्णय
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्यातील बस्तर या वनवासीबहुल जिल्ह्यातील सुकमा येथे माओवाद्यांनी धाकधपटशा दाखवून बंद केलेले प्राचीन राममंदीर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा भाविकांसाठी मुक्त करण्यात आले आहे. माओवाद्यांची धमकी आणि भीती झुगारुन या भागातील नागरिकांनीही या राममंदिराच्या पुनउ&द्घाटन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. प्रशासनाने या मंदिराची द्वारे दर्शनासाठी पुन्हा उघडी केल्यानंतर अनेक रामभक्तांनी मंदिरातील श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. हे मंदीर सुकमा भागातील केर्लापेंडा या ग्रामातील आहे.
हे मंदीर माओवाद्यांच्या भरवस्तीतच स्थित आहे. त्याचे स्थान तेडमेटला या माओवाद्यांच्या केंद्रापासून केवळ 10 किलोमीटरवर आहे. याच तेडमेटला केंद्राजवळ 2010 च्या भीषण हिंसाचारात केंद्रीय सुरक्षा दलांचे 76 सैनिकांचे हत्याकांड करण्यात आले होते. तसेच या मंदिरानजीक असणाऱ्या हिडमा या स्थानी 2021 मध्ये माओवाद्यांनी 22 सुरक्षा सैनिकांचे हत्याकांड केले होते.
भीतीमुळे नागरिकांची पाठ
काही काळापूर्वी या भागात माओवाद्यांचा धाक एवढा मोठा होता, की प्रशासनाचे नियंत्रण नसल्यापैकीच होते. या राममंदिरात कोणीही जाऊ नये असा आदेशच माओवाद्यांनी काढला होता. स्थानिक जनतेच्या मनात माओवाद्यांसंबंधी प्रचंड भय असल्याने त्यांचा आदेश मोडण्याचे धाडस कोणालाही होत नव्हते. तथापि, छत्तीसगडमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर आता या मंदिराला सुरक्षा देण्यात आली असून मंदिराची द्वारे उघडण्यात आली आहेत. नागरिकही प्रशासनाच्या धाडसी कृत्याचे कौतुक करीत आहेत.
2003 मध्ये घेतल होता ताबा
2003 च्या आसपास या भागात माओवाद्यांची मोठी दहशत होती. त्यांनी हे मंदीर धाक दाखवून बंद करावयास लावले होते. नागरिकांनाही त्यावेळी माओवाद्यांची भीती वाटत होती. 2003 च्या डिसेंबर महिन्यात छत्तीसगड राज्यात भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आली. त्यानंतर माओवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडण्यात आली. त्यामुळे या भागावरील माओवाद्यांचा विळखा सैल झाला. आता माओवाद्यांची पिछेहाट होत असून प्रशासनाचे नियंत्रण वाढले आहे.
सुरक्षा सैनिकांना दिसले मंदीर
आता या भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक तळ स्थापन करण्यात आला आहे. या दलाच्या सुरक्षा सैनिकांना हे मंदीर दिसल्यानंतर त्यांनी उघडण्यासाठी हालचालींना प्रारंभ केला. प्रथम त्यांनी स्थानिकांशी विचारविनिमय केला. लोकांचा पाठिंबा दिसून आल्यानंतर मंदीर उघडण्याचा निर्णय झाला.
रामनवमीसाठी सज्जता
एकवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे राममंदीर पुन्हा भक्तांसाठी मुक्त करण्यात आल्याने येत्या रामनवमीला येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण दक्षता घेण्यास आतापासूनच प्रारंभ केला आहे. रामनवमी 17 एप्रिल 2024 या दिवशी आहे. या मंदिरात यावेळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होण्याची शक्यता आहे.