सुगीला येळ्ळूर परिसरात जोमाने सुरुवात
धामणे, सुळगा, देसूर, राजहंसगड परिसरातील शिवारे माणसांनी गजबजली
वार्ताहर/येळ्ळूर
परतीच्या पावसाने खोळंबलेल्या सुगीला येळ्ळूर, धामणे, सुळगा, देसूर, राजहंसगड परिसरात जोमाने सुरुवात झाली असून गाव सुनासुना व शिवार माणसांनी गजबजलेला दिसतो आहे. परतीच्या पावसाने पाणी कमी झाले असले तरी काही ठिकाणी भातकापणी करून पाण्यातच भाताची आडवे टाकावी लागत आहेत. ती उचलून सुक्या जागी ठेवण्याचे दुहेरी काम शेतकऱ्यांना करावे लागले आहे. सुगीला जोरदार सुरुवात झाली असली तरी अजून काही भागात वाफ्यातून पाणी असल्याने ती लांबणीवर पडली आहे. उभी भातपिके आडवी होवून त्यावरुन पाणी गेल्यामुळे कापणी करताना करसत करावी लागते आहे. तर खाली चिखल आणि वरुन उन्हाचा तडाखा सहन करीत याही परिस्थितीत शेतकरी मिळतील त्या मजुरांवर शेतकरी कापणी आवरताना दिसतो आहे.
गेल्या दोन चार दिवसांत थंडी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळ्याची चाहुल लागली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कडक उन्हाचा फायदा भात कापणीबरोबर भात बांधणीला होत असून मिळालेल्या संधीचा फायदा घेत एका ठिकाणची भातकापणी आवारातच बांधणी करून लागलीच दुसऱ्या ठिकाणच्या भात कापणीकडे वळतो आहे. काही ठिकाणी आडव्या झालेल्या भाताबरोबर खाली चिखल असल्याने भात बांधणीला अडचण झाली असल्याने शिवार रस्त्याचा फायदा घेत रात्रीच्यावेळी मिळणाऱ्या मजुरांच्या सहाय्याने भात बांधणी न करता थेट मळणी करून रिकामी होत आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकरी कापणी, बांधणी आणि मळणी अशी तीनही हंगाम साधण्यात गर्क आहे.
एकाचवेळी आलेल्या भात कापणीमुळे मजुरांची टंचाई मोठ्याप्रमाणात जाणवत असून भाताची साथ साधण्यासाठी बाहेर गावाहून जादा मजुरीसह मजूर मागवत आहेत. तर कांही घरातील लहान-थोर मंडळींसह सुगीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावात कमालीची शांतता असून शिवार मात्र गजबजलेला आहे. बरेच शेतकरी मजुरांना ने-आण करण्यासाठी चारचाकी व रिक्षासारख्या वाहनांचा वापर करीत असल्याने दिवसभर उन्हातान्हात दमलेल्या मजुरांना दिलासा मिळतो आहे. मजूर मात्र पुढील दहा ते बारा दिवसांसाठी शेतकऱ्यांनी आधीच सांगून ठेवल्याने कुमक नसणारा शेतकरीवर्ग अडचणीत आला असून त्याला वाट पहावी लागत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची सुगी आवरण्याची लगबग सुरू असून परतीच्या पावसाचा धुमाकूळ विसरुन रब्बी हंगाम साधण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे.