For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंट झेवियर्स संघाकडे मृदुला सामंत चषक

10:23 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेंट झेवियर्स संघाकडे मृदुला सामंत चषक
Advertisement

मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धा, एम. व्ही. हेरवाडकर उपविजेता, गौरव गोधवानी, विनायक कामते उत्कृष्ट खेळाडू

Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटी, जीएसएस महाविद्यालय व बेळगाव फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मृदुला सामंत स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 2-0 असा पराभव करून मृदुला सामंत चषक पटकाविला. गौरव गोधवानी उत्कृष्ट खेळाडू , विनायक कामते उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून यांना गौरविण्यात आले. आरपीडी मैदानावरती खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त येडा मार्टीन मार्बन्यांग पुरस्कर्ते मधुकर सामंत, आनंद सराफ, ज्ञानेश कलघटगी, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब व इतर मान्यवरांच्या हस्ते सेंट झेवियर व हेरवाडकर संघांच्या खेळाडूंची ओळख करून अंतिम सामन्याला सुरूवात करण्यात आली. या सामन्यात तिसऱ्याच मिनिटाला हेरवाडकरच्या अथर्व नाकाडीने गोल करण्याची संधी दवडली.

12 व्या मिनिटाला झेवियर्सच्या सेफ मुजावरने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 17 व्या मिनिटाला सेंट झेवियर्सच्या सोफियन बेस्तीच्या पासवर गौरव गोधवानींने गोल करून 1-0 आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या ऋतेश कदमने वेगवान चेंडू गोलमुखात मारला होता. पण झेवियर्सच्या गोलरक्षक उजेरने उत्कृष्ट अडविला. 42 व्या मिनिटाला झेवियर्सच्या खेळाडूने चेंडू डीमध्ये जोरदार मारला असता चेंडू बाहेर काढण्याच्या नादात बचाव फळीतील खेळाडूच्या हाताला चेंडू लागल्याने पंचांनी सेंट झेवियर्सला पेनॉल्टी बहाल केली. त्याचा फायदा अर्जुन सानीकोप्पने उठवत गोल करून 2-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना हेरवाडकरच्या सौरभ पुजारीने गोल करण्याची संधी वाया दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात सेंट झेवियर्सच्या बचाव फळीने सुरेख खेळाचे प्रदर्शन घडविले.

Advertisement

सामन्यानंतर पोलीस आयुक्त येडा मार्टीन मार्बन्यांग, पुरस्कर्ते मधुकर सामंत, आनंद सराफ, ज्ञानेश कलघटगी, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, प्राचार्य एस. एन. देसाई, रामकृष्ण एन., प्रशांत मनकाळे, आनंद रत्नापगोळ, विनय नाईक, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, सचीव अमित पाटील, जॉर्ज राँड्रीग्ज, प्रशांत देवदानम, रवी चौगुले, एस. एस. नरगोडी, अनिकेत पतकी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंट झेवियर्स व उपविजेत्या एम. व्ही. हेरवाडकर संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू गौरव गोधवानी झेवियर्स, उत्कृष्ट संघ कनक मेमोरियल, उत्कृष्ट गोलरक्षक विनायक कामते केएलई, उगवता खेळाडू वृषभ बल्लाळ हेरवाडकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.  या स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, अखिलेश अष्टेकर, सुशांत यादव, एस. येळ्ळूरकर यांनी काम पाहिले.

अभ्यासाबरोबर खेळही आवश्यक : येडा मार्टीन मार्बन्यांग

सध्याच्या तंत्रज्ञान युगात अनेक विद्यार्थी मोबाईल, युट्यूब व वॅटस्अप याच्यात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांची प्रगती घटली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या अभ्यासाबरोबर दोन तास तरी खेळणे गरजेचे आहे. आपण मोबाईल व इतर गोष्टीत तीन ते चार तास वाया घालवितो. तोच वेळ खेळाकडे दिल्यास आपली प्रगती व एकाग्रता वाढू शकते. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने मुलांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ बनवून दिले आहे. तर एसकेई सोसायटीने सुसज्ज मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा व सरकारनेही प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज मैदान बनवावे तरच आपले खेळाडू उच्चस्तरावर पोहचू शकतील असे त्यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.