जाहीरनाम्यासाठी मतदारांकडून सूचना मागवणार
खासदार सदानंद शेट तानावडे यांची माहिती, भाजप संकल्प पत्र रथयात्रेचा शुभारंभ
प्रतिनिधी./ पणजी
लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपतर्फे 3 ते 15 मार्चपर्यंत संकल्प पत्र रथयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात भाजपच्या जाहीरनाम्यासाठी मतदारांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली. विकसित भारत घडविण्यासाठी लोकांच्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत, असेही तानावडे म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी संकल्प यात्रेची सुऊवात 26 फेब्रुवारीपासून पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या हस्ते झाली आहे. गोव्यातील जनतेच्या सूचना घेण्यासाठी राज्यात संकल्प पत्र रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील जनता रथयात्रेला चांगला प्रतिसाद देणार असून, गोव्यातून किमान 50 हजार सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे तानावडे यांनी सांगितले.
पणजीत शनिवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर व अन्य उपस्थित होते. मडगाव येथून ही मोहीम सुरू होईल.
संकल्प पत्र रथयात्रा राज्याच्या सर्व मतदारसंघांतून फिरणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील लोकांकडून भाजप जाहीरनाम्याबाबतच्या अपेक्षा, सूचना घेण्यात येणार आहेत. यासाठी लोकांना एक कार्ड देण्यात येईल. त्यावर आपल्या सूचना लिहून देणे अपेक्षित आहे, असे तानावडे यांनी यावेळी सांगितले. गोव्यात रथयात्रेचे निमंत्रक हे पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा होणार आहे. संकल्प पत्र रथ राज्याच्या सर्व मतदारसंघांतून फिरणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील लोकांकडून जाहीरनाम्याबाबतच्या काय अपेक्षा आहेत त्या समजून घेणे आणि त्या अनुषंगाने लोकांकडून सूचना मागवाव्यात, असा हा यात्रेमागील उद्देश आहे, असेही तानावडे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांना देशभरातून चांगला प्रतिसाद : मुख्यमंत्री
‘मॅनीफेस्टो यात्रा - सुझाव आपका संकल्प हमारा’ यानुसार ही मोहीम देशभर राबविण्यात येणार आहे. भाजपचा जाहीरनामा हा पक्षाचा नसून लोकांचा जाहीरनामा असेल. मतदारांकडून पत्र, मोदी एप, मिस कॉल देऊन किंवा अन्य माध्यमातून त्यांच्या कल्पना, सूचना मागविण्यात येणार आहेत. महिला, युवक, शेतकऱ्यांनी आपल्या सूचना जाहीरनाम्यासाठी द्याव्यात. भाजपने 2014 आणि 2019 च्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली आहे. 2024 च्या जाहीरनाम्यातील देखील सर्व आश्वासने पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत मोदींची गॅरंटी, काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास करताना गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारकडून भरीव कामे झाली आहेत. नवनवीन प्रकल्प गोव्यात येण्यासाठी गोवेकरांच्या पसंतीच्या आणि आवश्यक प्रकल्पांसाठी गोव्यातील जनतेनेही आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. मोदींना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इस बार 400 पार होणारच यात तिळमात्र शंका नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मान्यवरांच्याहस्ते संकल्पयात्रा व्हॅनचा शुभारंभ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही संकल्पयात्रा व्हॅनला झेंडा दाखवून शुभारंभ केला. पणजीत शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात मडगाव येथून यात्रेची सुरूवात होणार आहे