धारवाड महापालिकेसाठी शिष्टमंडळ स्थापण्याची सूचना
विधानसभेतील वादावादीनंतर समेटाचा प्रयत्न
बेळगाव : हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे विभाजन करून नव्याने धारवाड महानगरपालिका निर्माण करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्यपालांकडे आहे. राज्यपालांची मंजुरी मिळताच नव्या धारवाड मनपासाठी आवश्यक रूपरेषा ठरविण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. हुबळी-धारवाड पूर्व मतदारसंघाचे आमदार प्रसाद अब्बय्या यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली आहे. हुबळी-धारवाड महापालिका विभाजनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपच्या आमदारांमध्ये वादावादीचाही प्रसंगही विधानसभेत घडला. धारवाडला स्वतंत्र महानगरपालिका बनवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आंदोलन समितीने गंभीर आरोप केला आहे.
भाजपच्या प्रभावी नेत्यांमुळे यासंबंधीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पडून आहे, असे प्रसाद अब्बय्या यांनी सांगितले. भाजपचे महेश टेंगिनकाई यांनी याला आक्षेप घेतला. भाजपचे कोणीही यामध्ये आडकाठी घालणार नाहीत. तुम्ही त्यांचे नाव जाहीर करा, अशी मागणी महेश टेंगिनकाई यांनी केली. 21 जानेवारी 2025 रोजी हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे विभाजन करून धारवाडमध्ये स्वतंत्र महानगरपालिका निर्माण करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिपत्रकातही ते जाहीर करण्यात आले आहे, याकडे अब्बय्या प्रसाद यांनी सरकारचे लक्ष वेधले. हुबळी-धारवाड महापालिकेच्या विभाजनासंबंधीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. यासाठी पक्षभेद विसरून हुबळी-धारवाडमधील आमदारांनी राज्यपालांकडे शिष्टमंडळ नेण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला.