ऊस तोडणी यंत्र शेतकऱ्यांना वरदान
वेळेत उसाची तोडणी, समस्या दूर, उसाबरोबर सोयाबीन-ज्वारीची कापणी, कृषीतर्फे अनुदान
बेळगाव : ऊस तोडणीसाठी मजुरांची समस्या भेडसावणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हायटेक हार्वेस्टर हब (ऊस तोडणी यंत्र) वरदान ठरत आहे. बेळगाव जिल्ह्यात या यंत्राद्वारे सर्वाधिक उसाची तोडणी झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक बेळगाव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र आहे. मात्र ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रातील ऊस तोड मजुरांवर अवलंबून रहावे लागते. दरम्यान काही वेळा ऊस तोडणी लांबणीवर पडते. त्यामुळे उत्पादकांना फटका बसतो. अशा परिस्थितीत ऊस तोडणी यंत्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात ऊसाबरोबर सोयाबीन, हरभरा, ज्वारी आणि इतर पिकांची लागवड केली जाते. या पिकांच्या कापणीसाठीदेखील हे यंत्र (मल्टी-क्रॉप हार्वेस्टिंग मशिन) वितरीत करण्यात येत आहे.
77 ऊस तोडणी यंत्रे बेळगाव जिल्ह्यात
कृषी खात्यामार्फत अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 50 टक्के तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदानातंर्गत ही यंत्रे दिली जात आहेत. जिल्ह्यात 2024-25 या सालात 141 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 31 शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राचे वाटप झाले आहे. राज्यात सर्वाधिक 77 ऊस तोडणी यंत्रे बेळगाव जिल्ह्यात देण्यात आली आहेत. या हार्वेस्टर मशिनद्वारे रात्रीच्या वेळेलाही उसाची तोडणी करता येते. एका दिवसात 10 एकरपेक्षा अधिक ऊस तोडणी होते. त्यामुळे तोडणीत या यंत्राची मदत होत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वेळेत ऊस तोडणी करण्यासाठी यंत्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार ठरू लागले आहे.
दिवसात 10 एकरपर्यंत ऊस तोडणी
मजुरांच्या कमतरतेमुळे उसाची तोडणी वेळेवर होत नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांचे नुकसान होते. या समस्येवर मात करण्यासाठी ऊस तोडणी यंत्राचे वाटप केले जात आहे. एका दिवसात 10 एकर पर्यंत या यंत्राद्वारे ऊसतोडणी होऊ शकते. शिवाय ऊस कारखान्यात वेळेत पोहोचविणे शक्य होते.
- शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)