तालुक्याच्या पूर्वभागामध्ये ऊसतोडणी अंतिम टप्प्यात
मजुरांच्या टोळ्या परतीच्या मार्गावर : ऊस लागवडीत वाढ करण्याचा विचार : कारखान्यांनी ऊसबिले त्वरित देण्याची मागणी
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आली असून मजुरांच्या टोळ्या परतीच्या मार्गावर लागल्या आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा, सुळेभावी आदी भागांमध्ये ऊसपीक मोठ्या प्रमाणावर पिकविण्यात येतो. सीमाभागातील अनेक साखर कारखाने या भागातील उसाची उचल करतात. साधारण नोव्हेंबर महिन्यापासून उसाची तोडणी सुरू होती. सध्या ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आली असून अनेक कारखान्यांच्या मजुरांच्या टोळ्या परतल्या असून उर्वरित परतीच्या मार्गावर आहेत.
ऊस लागवडीत वाढ
यंदा पूर्वभागामध्ये शिवारात ऊस लागवडीमध्ये वाढ झाली आहे. शेतामध्ये ऊस लागवड मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने ऊस पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.
गुऱ्हाळ हंगामही अंतिम टप्प्यात
पूर्वभागातील गुऱ्हाळ हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पूर्वभागात साधारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपासून गुऱ्हाळघरे सुरू होतात. पूर्वभागातील गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत चालली असली तरी उर्वरित गुऱ्हाळघर व्यावसायिकांनी आपला पारंपरिक वडिलोपार्जित व्यवसाय टिकवून ठेवला आहे. पन्नासहुन अधिक असलेली गुऱ्हाळघरे आता 25 च्या आसपास येऊन पोहोचली आहेत. पुढील दहा ते पंधरा दिवसात गुऱ्हाळघरे बंद होतील, अशी माहिती सांबरा येथील गुऱ्हाळ व्यावसायिक भुजंग जोई यांनी दिली.
ऊस बिले देण्यास विलंब
सध्या ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असली तरी अनेक साखर कारखान्यांनी संबंधित ऊस व्यावसायिकांची बिले देण्यास विलंब करत आहेत. तरी संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने ऊस बिले अदा करावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.