Sangli : सांगलीत अवकाळीमुळे ऊसतोड ठप्प ; मजुरांसह जनावरांवर उपासमारीची वेळ
अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल
कडेगांव : दिवाळीनंतर राज्यभरातील अनेक साखर कारखान्यांचा धुराडे पेटून गळीत हंगामाला सुरुवात झाली होती. गावागावांतून ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल होऊन शेतांमध्ये ऊसतोड कामाला सुरुवात झाली होती. मात्र, विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावताच 'कोयता थांबला, हंगाम लांबला', अशी परिस्थिती आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस बरसत असून, सकाळी ऊन आणि दुपारी पाऊस, अशा वातावरणामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे तोडणी थांबवावी लागली असून, याचा थेट परिणाम साखर गाळप हंगामावर होणार आहे. हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता शेतकरी आणि कारखानदार या दोघांनाही चिंतेत टाकणारी आहे.
पिकांचे मोठे नुकसान
चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता ऊसतोडणी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने यावर्षी गाळप हंगामाची सुरुवात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे निर्देश दिले असले तरी सध्याच्या हवामानामुळे तोडणी थांबल्याने गाळप उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे तोडलेला ऊसही
शेतात पडून आहे.
संसारोपयोगी साहित्य पाण्यात दरम्यान, पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हालही वाढले आहेत. हे मजूर पाचट, ताडपत्री किंवा कापडांच्या झोपड्यांमध्ये राहतात. पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये शिरल्याने त्यांचे धान्य, कपडे व इतर साहित्य भिजले आहे. काही मजुरांना झोपण्यासाठी ट्रॅक्टरखाली किंवा शाळांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.
जमीन चिखलमय
यंदा ऊसतोडणीस मजूर वेळेवर आल्यामुळे हंगाम सुरळीत सुरू होईल, असे वाटत होते. पण गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून जमीन चिखलमय झाली आहे. मजुरांना ऊस तोडता येत नाही. ट्रॅक्टरही शेतात रूतून बसले आहेत.
महेश देशमुखे, शेतकरी कडेगाव