Satara : दौंडेवाडीत ऊस पिकाला आग; सव्वादोन लाखांचे नुकसान
दौंडेवाडीतील ऊस शिवार जळून खाक
खटाव : दौंडेवाडी (ता. खटाव) येथील शिवारात काल संध्याकाळच्या सुमारास तोडणीला आलेल्या उसाच्या फडाला आग लागली. यामध्ये एक एकरावरील ऊस जळून खाक झाला. शहाजी शिवाजी जाधव व धनाजी भिवा गायकवाड यांचे सुमारे सव्वादोन लाखांचे नुकसान झाले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील उसाच्या शिवारात शहाजी शिवाजी जाधव व धनाजी भिवा गायकवाड यांनी दोन एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. अठरा महिन्यांचा कालावधी उलटला, मात्र तोड न झाल्याने ऊस शेतात उभा होता. सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
आग भडकल्याचे गायकवाड यांच्या शेजारील तुकाराम शिंदे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी गावातील तरुणांना फोनद्वारे माहिती दिली. शेतमालकाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी इतर ग्रामस्थांसह शेतात धाव घेतली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून अर्ध्या शिवारात शेतावरील विद्युत मोटार सुरू करून व निम्मा ऊस वाचवण्यात यश मिळवले. दरम्यान, यावर्षी अतिपावसाने खरिपाचा हंगाम वाया गेला आणि आता हातातोंडाशी आलेले ऊस पीक जळल्याने शहाजी जाधव व धनाजी गायकवाड या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.