For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखर कारखान्यांकडे उसाचे बिल थकले

06:10 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
साखर कारखान्यांकडे उसाचे बिल थकले
Advertisement

शेतकरी चिंतेत : साखर निर्यात-इथेनॉल उत्पादनही थांबले

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

यंदा दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच साखर कारखान्यांकडे उसाची बिले थकल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दरम्यान केंद्र सरकारने साखर निर्यात आणि इथेनॉल उत्पादनाला स्थगिती दिल्याने कारखान्यांच्या उत्पादनालाही ब्रेक लागला आहे.

Advertisement

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला होता. मार्च अखेरीस गळीत हंगाम पूर्ण झाले होते. उसाचा पुरवठा झाल्यापासून 14 दिवसांच्या आत उसाचे बिले जमा करणे आवश्यक आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप बिल जमा झाले नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.

यंदा राज्यातील 75 साखर कारखान्यांनी 5.32 कोटी मेट्रीक टन ऊस गाळप केला आहे. त्यातून 48.75 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस तोडणीचा हंगाम संपून तीन महिने उलटले तरी साखर कारखान्यांकडे 1500 कोटींची थकबाकी आहे. बहुतांशी साखर कारखान्यांनी सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी दरानुसार उसाचे बिल दिले नाही. सरासरी 2790 ते 3000 हजार रुपये प्रतिटन दर दिला आहे. थकबाकीचे बिल दुसऱ्या हप्त्यात दिले जाईल, असे साखर कारखान्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र काही कारखान्यांनी पहिला हप्ताही दिला नाही. त्यामुळे साखर उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.

साखर कारखान्यांकडून उसाची बिले मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजाची रक्कम भरणेही अशक्य होऊ लागले आहे. यंदा पावसाअभावी ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी केवळ 30 ते 38 टन उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे एकरी 20 टनांचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात उसाचा पुरवठा केला आहे. मात्र वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आधी दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीच्या सावटाखाली जगणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे.

Advertisement
Tags :

.