For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभेआडून साखरपेरणी...

06:27 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभेआडून साखरपेरणी
Advertisement

अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या चांगलाच चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून खावा लागलेला मार, बारामतीतून पत्नीला पत्करावा लागलेला पराभव, घड्याळामुळेच गणित बिघडल्याची मित्रपक्षांकडून होणारी मांडणी अशा सगळ्या गलबल्यात दादांनी राज्यसभेवर पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देऊन सगळा धुरळा खाली बसविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. अर्थात सुनेत्रा पवार यांच्या निवडीने पवार घराण्याकडे एकवटलेला सत्तेचा लंबकही ठळकपणे अधोरेखित झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मागच्या दशकभरापासून राज्यसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सुप्रिया सुळे या 2009 पासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यात आता सुनेत्रा पवार यांचीही भर पडल्याने संसदेत पवार घराण्यातील तीन खासदार दिसतील. त्यात शरद पवार व सुनेत्रा पवार हे तर एकाच सभागृहात असतील. महाराष्ट्राच्या विधिमंडळात अजित पवार व रोहित पवार हे पवार घराण्याचे दोन चेहरे आहेत. अजितदादा बारामतीचे, तर रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत. आता नव्याने युगेंद्र पवार यांचेही नावही बारामतीकरिता पुढे आले आहे. त्यामुळे पवार घराण्याकडे सत्तेचे केंद्रिकरण झाल्याचा आरोप अनाठायी मानता येत नाही. तशी भारतासारख्या देशात घराणेशाही नवीन नाही. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची मिरासदारी आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध करणारा भाजपाही याला अपवाद नाही. राजनाथसिंह, अमित शहा यांच्यापासून पक्षाच्या अनेक नेत्यांची मुले या ना त्या माध्यमातून राजकीय वा लाभाच्या पदांवर कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची मुलेही राजकारणात सक्रिय आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही खासदारपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. हे पाहता ही घराणेशाही सर्वपक्षीयच आहे, यात संदेह नाही. परंतु, महाराष्ट्रासारख्या राज्यात एकाच घरात इतकी पदे जाणे, हे नक्कीच काहीसे खटकणारे म्हणता येईल. दादांनी 2019 मध्ये पुत्र पार्थलाही मावळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरविले होते. पार्थ विजयी ठरला असता, तरी ही संख्या कदाचित आणखी वाढली असती. आता स्वपक्षीयांना डावलून दादांनी पत्नीला खासदार करण्याचा निर्णय घेतला, त्या अर्थी नक्कीच त्यामागे त्यांचे काही आडाखे असू शकतात. त्यातला पहिला उद्देश म्हणजे बारामतीत निधी आणून सुप्रिया सुळे यांना शह देणे. सुप्रिया सुळे यांची ही चौथी टर्म आहे. त्यांना हरविण्याचा हेतू तूर्तास साध्य झाला नसला, तरी हा प्रयत्न सोडून देणाऱ् यातील दादा नाहीत. म्हणूनच नव्याने मतदारसंघ बांधणीच्या कामाला ते लागले असावेत. त्यासाठी बारामतीत विकासाच्या विविध योजना कशा आणता येतील, त्यातून येथील नागरिकांना कसे चुचकारता येईल, यावर त्यांचा भर दिसत आहे. आपल्या आजवरच्या आमदारकीच्या काळात दादांनी बारामतीत अनेक प्रकल्प आणून विकासकामांची राळ उडवून दिली. परंतु, त्याच दादांविरोधात आता युगेंद्रच्या ऊपाने प्रतिस्पर्धी तयार केला जात आहे. हे ओळखून दादांनी सुनेत्रा पवार यांना खासदारकीची संधी दिल्याचे पहायला मिळते. किंबहुना, सुनेत्रा यांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली, तरी आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. केंद्रीय सहकार मंत्रिपद अमित शहा यांच्याकडे आहे. तर सहकार राज्यमंत्रिपदाचा कार्यभार पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे. यातील साखर हा विभाग त्यांच्याच खात्यात मोडतो. मोहोळ यांच्याकडे नागरी उ•ाण मंत्रिपदाचीही जबाबदारी असल्याने त्यांच्याकडील सहकारी खात्याची जबाबदारी अन्य कुण्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. हे नेतृत्व दुसरे तिसरे कुणी नव्हे, तर सुनेत्रावहिनीच असतील, असे म्हटले जाते. पश्चिम महाराष्ट्र हा साखर पट्टा म्हणून ओळखला जातो. तथापि, साखर पट्ट्यात या खेपेला महायुतीला जबर फटका बसला. अनेक मतदारसंघ हातातून गेले. हे पाहता पश्चिम महाराष्ट्रात साखरपेरणी करणे, ही बाब सत्ताधाऱ्यांकरिता महत्त्वाची असेल. त्याच दृष्टीकोनातून राज्यमंत्रिपदाकरिता सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आले, असे म्हणायला जागा आहे. दादांचे अमित शहा यांच्याशी चांगले ट्युनिंग आहे. त्यामुळे भविष्यातील समीकरणे लक्षात घेता ही चर्चा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता संभवते. दुसरीकडे खासदारकीवरून दादांच्या गटात काहीशी नाराजी निर्माण झालेली दिसते. राज्यसभेकरिता छगन भुजबळ हे इच्छुक होते. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यात आला. सातारच्या नितीन पाटील यांना तर अजितदादांनी शब्दच दिला होता. परंतु, हा शब्द घरात खासदारकी देण्यासाठी दादांनी फिरविला, असा मॅसेज सर्वत्र गेला. हे नरेटिव्ह दादा कसे दूर करणार व पक्षांतर्गत असंतोष कसा मिटविणार, हे पहावे लागेल. आधीच विधानसभेतही अनेक नेते तुतारी हात घेऊन लढण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे दादांनी साधलेले टायमिंग चुकीचे तर नाही ना, अशाही शंका घेतल्या जात आहेत. हे बघता स्वपक्षातील कटुता टाळण्याचेही दादांपुढे आव्हान असेल. दादा स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. त्यांची रणनीती समजून घेण्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत. तर पवारांच्या खेळ्या भल्याभल्यांना कळत नाही. राजकारणात टिकायचे असेल, तर व्यूहरचनेशिवाय पर्याय नसतो. सगळेच पत्ते ओपन ठेवले, तर टिकाव धरणे मुश्कील बनते. लोकसभेतील पराभवातून दादांनी हा धडा घेतला असावा. पत्नीला संधी देणे, हे त्यांचे धक्कातंत्रच म्हणावे लागेल. पण, केवळ धक्कातंत्राचे राजकारण करून उपयोग नसतो. त्याचे ऊपातंर यशात होणे, हे सर्वांत महत्त्वाचे होय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेआडून दादा कोणकोणती गणिते साधणार, हे अधिक महत्त्वाचे असेल. बारामतीसाठी निधी खेचणे, सहकाराच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवणे, हे दादांचे सुप्त हेतू साध्य होतात का, हेच आता पहायचे.

Advertisement

Advertisement
Tags :

.