साखर कारखान्यांना ठरल्याप्रमाणे दूसरा हप्ता द्यावा लागेल- पालकमंत्री हसन मुश्रीफ
आंदोलन अंकुशचे गतहंगामातील दूसऱ्या हप्त्याबाबत आंदोलन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना ठरल्याप्रमाणे गतहंगामातील ऊसाला दूसरा हप्ता द्यावा लागेल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाला दिली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री मुश्रीफ आणि आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. दरम्यान आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी 15 दिवसात शेतकऱ्याना दूसरा हप्ता न मिळाल्यास पालकमंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
स्वातंत्र्यदिनी आंदोलन अंकुशच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गतहंगामातील ऊसच्या दूसऱ्या हप्त्याबाबत बेमुदत उपोषण केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी साखर सहसंचालक माळवे यांनी दूसरा हप्त्याबाबतचे प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भात शासनाला पत्र पाठवत असल्याचे सांगितले. यावर शिष्टमंडळाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ व शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीमध्येच मंत्री मुश्रीफ यांनी सहकार मंत्र्यांशी चर्चा करुन कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर करण्याबाबत सांगितले. तसेच सर्व साखर कारखान्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगत आंदोलन थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन अंकुशने उपोषण तात्पुरते स्थगित केले.
बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रकाश अबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, साखर सहसंचालक गोपाळ माळवे, आंदोलन अंकुशचे उदय होगले, दिपक पाटील, संभाजी शिंदे, नागेश काळे, संजय चौगुले, अविनाश लाड, दत्तात्रय जगदाळे, पिंटू ढेकळे, प्रमोद बाबर, बंटी माळी, बाळासो भोगावे, दादूनशा फकीर, संपत मोडके आदी उपस्थित होते.