साखर कारखान्यांनी तातडीने एफआरपी जाहीर करावी
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुरु झाला आहे.पण अद्याप कोणत्याही कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली नाही. साखर कारखान्यांनी तातडीने एफआरपी जाहीर करावी अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. त्यामुळे बरेच कारखाने या दरम्यान सुरू झालेले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिह्यातील साखर कारखान्यांनी देखील आपला गळीत हंगामाचा प्रारंभ करून गाळप सुरु केला आहे. परंतु साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे ऊसदर निश्चित करून तो प्रसिध्दी माध्यमातून जाहीर करणे आवश्यक आहे.
हा नियम असताना देखील कोल्हापूर जिह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप आपल्या साखर कारखान्यांची एफआरपी निश्चित करून त्याप्रमाणे होणारी रक्कम अथवा ऊस दरापोटी एकरकमी दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे कोल्हापूर जिह्यातील सर्व साखर कारखान्यांना तातडीने ऊसदर जाहीर करण्यासंदर्भात सूचना देण्यासाठी संयुक्त बैठक बोलवावी. या बैठकीस शिवसेना पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन ऊस दराबाबत मत आजमावण्याची परवानगी मिळावी.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे,उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, संजय चौगले,वैभव उगळे, सुरेश चौगले, युवराज पोवार,बाबासाहेब पाटील,हर्षल पाटील,राजू रेडेकर,सूरज डावरे उपस्थित होते.