वळिवाने जमिनीत पुरेसा ओलावा
प्रतिनिधी / बेळगाव
मागील आठवडाभरापासून होत असलेल्या वळीव पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. विशेषत: माळरानावर ओल्या चाऱ्यासाठी बाजरी, मका आणि ज्वारीची पेरणी केली जात आहे. यंदा दुष्काळामुळे चारा समस्या गंभीर बनू लागली आहे. अशा परिस्थितीत चाऱ्यासाठी पेरणी केली जात आहे.
यंदा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे. चिकोडी, हुक्केरी, अथणी परिसरात चारा बँक सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी चारा बँक नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. अशा परिस्थितीत काही प्रमाणात वळीव बरसल्याने चाऱ्याचा प्रश्न दूर होणार आहे. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची वळिवाकडे नजर लागून होती. मात्र, आता दमदार वळीव बरसू लागला आहे. त्यामुळे रानोमाळ नवीन गवताची उगवण होऊ लागली आहे. त्यामुळे काही प्रमाणात चाऱ्याची टंचाई दूर होणार आहे.
पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना जोर
चारासंकट दूर करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माळरानावर बाजरी, मका आणि ज्वारी पेरणीला प्राधान्य दिले आहे. तर पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही जोर येऊ लागला आहे. मे अखेरीस धूळवाफ पेरणीला प्रारंभ होतो. यासाठी शिवारात बांध घालणे, शेणखत टाकणे आणि इतर कामांनाही वेग येऊ लागला आहे.