सुदिनं सुदिनं जन्मदिनम्
प्राचीन काळी कुटुंबातील सदस्यांना स्वत:चे व इतरांचे वाढदिवस केव्हा असतात हे माहीत नसायचे. कारण माणसांचे जन्मदिवस साजरे करण्याची पद्धत समाजात रूढ नव्हती. पूर्वापार चालत आलेले आणि आनंद देणारे परमेश्वराचे, संतांचे जन्मोत्सव तेवढे थाटामाटाने साजरे होत असत. नंतर मुलामुलींचे वाढदिवस शाळेत चॉकलेट वाटून व एक दिवस गणवेशाला सुट्टी देऊन, नवे कपडे परिधान करून व्हायला लागले.
पुढे वाढदिवसाचे प्रस्थ एवढे वाढले की घरातल्या कुत्र्यामांजरांसह संस्था, वास्तू, छोट्या छोट्या वस्तू यांचेही वर्धापन दिन साजरे होऊ लागले. ज्येष्ठ नागरिकांचे जन्मदिवस ही तर कुटुंबातील म्हणण्यापेक्षाही समवयस्क मंडळींमध्ये धुमधडाक्यात साजरी होणारी एक ठळक भपकेबाज गोष्ट ठरली. आजच्या भ्रमणध्वनीयुगात भावना व मन यांना वगळून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा दिवसभर यांत्रिक पाऊस पडतो. त्यातच वाढदिवस कधी संपून जातो ते कळतसुद्धा नाही.
माणसाच्या आयुष्यात त्याचा जन्मदिन ही एक अंतर्मुख करणारी घटना आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात, ‘जवंजवं बाळ बळीया वाढे। तवं तवं भोजे नाचती कोडे। आयुष्य निमाले अंतुलियेकडे। ते ग्लानीची नाही?’ या जगाची तऱ्हा उफराटी आहे. लहान बाळ जसजसे वाढत जाते तसे त्याचे कौतुक करतात. अहो, पण त्याचे आयुष्य दिवस व क्षणाक्षणांनी कमी होते आहे हे त्यांना कळत नाही. माऊली पुढे म्हणतात, ‘जन्मलेल्या दिवसदिवसे। हो लागे काळाचेची ऐसे। की वाढती करिती उल्हासे । उभवती गुढिया?’ वाढदिवस साजरे करतात, गुढ्या उभारतात. परंतु हा दिवसेंदिवस काळाच्या अधीन होत चाललेला आहे हे विसरतात. माणसे इच्छेच्या गदारोळात आयुष्य फुकट संपवून टाकतात. हेच माऊलींना सांगायचे आहे. सृष्टीमधल्या प्रत्येक जिवाला षडविकारांचा शाप आहे. जन्म, अस्तित्व, वर्धन, परिवर्तन, अपक्षय आणि नाश. माणसाने याचा जन्मदिवशी विचार केला पाहिजे. अंतकाळी आपल्याला काय उपयोगी पडेल? मनाची अवस्था कशी असेल? माऊली म्हणतात, ‘मृत्यूलोकात जन्माला आलाच आहात ना, तर मग अंग झाडून भक्तीच्या वाटे लागा. जरासुद्धा उशीर करू नका. भक्तीमुळे तुम्ही परमेश्वराच्या निजधामाला येऊन पोहोचाल.’
श्रीमद्भागवतात श्रीकृष्णाच्या पहिल्या वाढदिवसाची गोष्ट भागवतकार रंगवून सांगतात. त्या दिवशी नंदाच्या वाड्यात उत्सवाची जोरदार तयारी चालली होती. घर सजले होते. यशोदा माता सकाळपासून कृष्णाचे लाड करण्यात गुंतली होती. तिने त्याला स्नान घालून नवे कपडे घातले. गळ्यात मोत्यांच्या माळा, भाळी मोरपीस व तिलक लावून तिने कृष्णाला नटवले. ती म्हणाली, ‘बाळा आज तुझा प्रथम वाढदिवस. आज तू ‘एक’ वर्षांचा झालास’. एवढे म्हणायचा अवकाश की कृष्णाने हातामधला लोणीसाखरेचा गोळा फेकून दिला आणि तो मोठ्याने रडू लागला. यशोदा पुन्हा पुन्हा त्याला समजावत निरनिराळ्या तऱ्हेने सजवू लागली. मात्र कृष्णाने फेकाफेक, चिडचिड करत काजळ विस्कटून टाकले. कपडे फेकून दिले. कृष्ण आजच्या शुभ दिवशी असे का करतो? हे यशोदेला काही केल्या कळेना. स्वामी माधवानंद म्हणतात, ‘कृष्ण हा अनादि, अनंत आहे. अशा ईश्वराला एक वर्षाच्या काळाच्या मापाने मोजले जाते आहे याचा त्याला राग आला. परंतु तेव्हा गोकुळातल्या कुणालाही ते कळणे शक्य नव्हते.’
परमात्मा आणि संत यांच्या जन्मात आणि माणसाच्या जन्मात काय फरक आहे असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना विचारले असता महाराज म्हणाले, ‘माणूस पूर्वकर्माने बांधलेल्या प्रारब्धामुळे जन्माला येतो. त्याला जन्माला यावे लागते. परमात्मा स्वखुशीने, स्वेच्छेने जन्माला येतो. परमात्मा हा कर्माच्या पलीकडे आहे. भगवंताला कुठला आला आहे जन्म? तो आहे ही जाणीव माणसाच्या मनात दृढ झाली की माणूस विषयांमध्ये रमताना विचार करेल. भगवंत काल होता, आज आहे, आणि उद्या राहणारच. म्हणून त्याचा जन्म न करता वाढदिवस करायला पाहिजे.’
एकसष्टी व पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन सोहळा असे ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करतात. त्यामागे अनेक कारणे आहेत. निवृत्त झाल्यानंतर आपल्या अस्तित्वाचा लोप होतो की काय? ही मनामध्ये भीती. त्याबरोबरच घरात आता आपली गरज संपली की काय ही धास्ती. देह थोडा थोडा क्षीण होतो आहे. पूर्वीसारखे कष्ट आता शक्य नाही ही जाणीव मन उदास करते. सगळ्या वाढदिवस समारंभात होमहवन व शास्त्राsक्त पूजा होतात. त्यात सहस्रचंद्रदर्शन ही साक्षात चंद्राची पूजा आहे. माणसाचे आयुर्मान शंभर वर्षे इतके धरले आहे. सद्यकाळात एवढे दीर्घ आयुष्य जगणारे थोडे लोक आहेत. नव्वदी गाठणारे बरेच आहेत. शास्त्र असे सांगते की भूलोकी देह सोडल्यानंतर जीव धुम्रलोक, रात्र, कृष्णपक्ष, दक्षिणायनाचे सहा महिने पितृलोक, आकाश आणि शेवटी चंद्रलोकावर जाऊन पोहोचतात. त्याला चंद्रलोकावर जायला एक वर्ष लागते. तिथे पोहोचल्यावर ते तेथील अमृतान्न सेवन करून निर्वाह करतात. देह सुटल्यावर जिथे जायचे आहे त्या चंद्राची पूजा करून त्याला संतुष्ट करणे हा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा हेतू असावा.
जन्मदिन उत्सवाला ‘तुला’ करण्याची पद्धत आहे. त्यामागील भावना उदात्त आहे. ‘तुलादान’ हे महादान आहे. तुला तयार करताना त्याच्या मध्यभागी विष्णूप्रतिमा असते. ज्यांचा तुलाभार करायचा आहे ती व्यक्ती तराजूला तीन प्रदक्षिणा करून तुलेची प्रार्थना करते. तुलादेवी ही एक शक्ती आहे. ती निवाडा करून जगाचे हित साधते. तिला प्रार्थना करतात की मला तोलून तू या संसारातून माझा उद्धार कर. पारडे जड झाले की दानविधी होतो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सत्यभामेने श्रीकृष्णाचा तुलाभार केला. श्रीकृष्ण केवळ एका तुलसीदलावर तोलला. वाढदिवस साजरे करण्याचे अनेक पैलू आहेत. त्यात जन्माला घातलेल्या परमेश्वराचे कृतज्ञतापूर्वक स्मरण हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे.
-स्नेहा शिनखेडे