साताऱ्याची सुदेष्णा वेगवान धावपटू, संजीवनीला सुवर्ण
दहा हजार मीटर शर्यतीत संजीवनीला सुवर्ण तर किरणला रौप्य
वृत्तसंस्था/ डेहराडून
नाशिकची खेळाडू संजीवनी जाधवने दहा हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिला दिवस गाजविला. सातारा येथील खेळाडू सुदेष्णा शिवणकरने वेगवान धावपटूचा मान मिळविला, तर पुरुषांच्या गटात पुण्याचा खेळाडू प्रणव गुरव याला शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळाले. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथमच रोबोचा उपयोग दिसून येत आहे. पदक वितरण प्रसंगी तसेच थाळी फेक स्पर्धेच्या वेळी रोबो चा उपयोग करण्यात आला.
राजीव गांधी क्रीडा संकुलातील गंगा आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्टेडियमवर आज या स्पर्धेचा पहिला दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंददायी ठरला. सुदेष्णा शिवणकरने 100 मीटर धावण्याची शर्यत 11.76 सेकंदात जिंकली. प्रणव गुरवने शंभर मीटर्स धावण्याची शर्यत 10.32 सेकंदात पार केली. त्याला अगदी थोडक्यात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
साताऱ्याच्या सुदेष्णाची सोनेरी कामगिरी
सातारा येथे गेली आठ वर्षे मातीच्या मैदानावरच सराव करणाऱ्या सुदेष्णाने कृत्रिम ट्रॅकवर सराव करणाऱ्या खेळाडूंना मागे टाकत यश मिळवले. तिचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. 2023 मध्ये झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. 21 वर्षीय सुदेष्णा ही सातारा येथेच ज्येष्ठ प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने नेत्रदीपक यश मिळवले असून तिला इन्कम टॅक्समध्ये नोकरी मिळाली आहे.
कृत्रिम ट्रॅक लवकर व्हावा : सुदेष्णा
आमच्या शहरात कृत्रिम ट्रॅक करिता शासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हा ट्रॅक तयार करावा म्हणजे सातारा येथून आणखी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असे सुदेष्णाने सांगितले.
नाशिकच्या संजीवनीला सुवर्ण
महिलांच्या दहा हजार मीटर शर्यत संजीवनीने 33 मिनिटे 33.47 सेकंद या वेळेत पूर्ण केले. या शर्यतीमध्ये सुरुवातीपासूनच तिने आघाडी घेतली होती. आणि शेवटपर्यंत तिने ही आघाडी कायम ठेवली. किंबहुना शेवटच्या टप्प्यात तिने साडेतीनशे मीटर्सची आघाडी घेतली होती. तिचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी तिने याच क्रीडा प्रकारात एक रौप्य व एक सुवर्णपदक जिंकले होते.
परभणीच्या किरणचे पदार्पणातच पदक
पुरुष गटात किरणने दहा हजार मीटर्सचे अंतर 29 मिनिटे 04.76 सेकंदात पार केले हिमाचल प्रदेशच्या सावन बरवालने ही शर्यत 28 मिनिटे 49.93 सेकंदात पूर्ण करीत रौप्यपदक जिंकले. या शर्यतीमध्ये सात किलोमीटर पर्यंत किरण हा सावन बरोबर धावत होता मात्र नंतर बरवाल याने जोरदार मुसंडी मारून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकविली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. 23 वर्षीय खेळाडू किरण हा मूळचा परभणी जिह्यातील उसळदवाडी या खेडेगावातील खेळाडू आहे. बारावी इयत्ता पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये हवालदार या पदावर काम करीत असून तेथे त्याला युनूस खान यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
विजेतेपद राखायचे माझे ध्येय
यंदा विजेतेपद राखायचे माझे ध्येय होते आणि त्या दृष्टीनेच मी या शर्यतीचे नियोजन केले होते. सुवर्णपदकासाठी चिवट लढत झाली असती, तर विक्रमी वेळ नोंदविली असती. मोठी आघाडी होती तरीही सातत्यपूर्ण वेग ठेवला होता.
नाशिकची वेगवान धावपटू, संजीवनी जाधव
जिम्नॅस्टिक्सच्या एक्रोबॅटिक व एरोबिक्स प्रकारात महाराष्ट्र अंतिम फेरीत
गतवर्षी पाच सुवर्णपदकासह गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजविणाऱ्या महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही जिम्नॅस्टिक्समध्ये धडाकेबाज सुरुवात केली. एक्रोबॅटिक व एरोबिक्स या दोन्ही प्रकारात महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठून आपला दबदबा कायम ठेवला. येथील भागीरथी संकुलात शनिवारपासून जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह प. बंगाल, हरयाणा व कर्नाटक या पाच राज्यातील संघ सहभागी झाले आहेत. महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे आणि निक्षिता खिल्लारे या जोडीने बॅलन्स सेटमध्ये नेत्रदीपक रचना सादर करून 21.110 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जयस्वाल जोडीने सर्वाधिक 19.010 गुणांची कमाई केली. महिला गटात सोनाली कोरडे, आर्णा पाटील व अक्षता ढोकळे या महाराष्ट्राच्या त्रिकुटाने 22.390 गुणांची कमाई करीत अपेक्षेप्रमाणे अव्वल स्थान मिळविले. पुरुष गटात रितेश बोखडे, प्रशांत गोरे, नमन महावर व यज्ञेश बोस्तेकर या जोडीने सर्वाधिक 23.670 गुणांसह प्रथम स्थान मिळवीत महाराष्ट्राचा दरारा कायम ठेवला.
एरोबिक्स प्रकारातही महाराष्ट्राचाच दबदबा बघायला मिळाला. या प्रकारातही महाराष्ट्राने महिला दुहेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला गट व पुरुष गटात नेत्रदीपक कामगिरी करीत सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. मिश्र तिहेरी आर्य शहा, स्मित शहा व रामदेव बिराजदार या त्रिकुटाने 16.25 गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात संदेश चिंतलवाड, स्मित शहा, अभय उंटवाल, उदय मधेकर, विश्वेश पाठक यांनी 15.80 गुणांसह पहिले स्थान मिळवित महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित केले.