कुमारस्वामींच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव
पत्रकार परिषदेत बोलत असताना घटना : तात्काळ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तात्काळ बेंगळुरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भाजप-निजद समन्वय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना रविवारी ही घटना घडली. मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे नाव आल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी बेंगळूर ते म्हैसूर पदयात्रा आयोजित करण्यासंदर्भात रविवारी सायंकाळी भाजप-निजद समन्वय समितीची एका खासगी हॉटेलमध्ये बैठक झाली. बैठकीनंतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कुमारस्वामी यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे काहीकाळ खळबळ उडाली. दरम्यान, त्यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी रुग्णालयात दाखल झाले होते.
अचानक कुमारस्वामींच्या नाकातून रक्त येऊ लागले. हा रक्तस्त्राव पाहून येडियुराप्पा आणि इतर नेते घाबरून गेले आहेत. कुमारस्वामींनी वारंवार त्यांचे नाक कापडाने पुसले. तरीही रक्तस्त्राव थांबत नव्हता. पुन्हा नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पांढरा शर्ट रक्ताळलेला आहे. हे पाहून मुलगा निखिल कुमारस्वामी त्यांना जयनगर अपोलो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. कुमारस्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
प्रकृती स्थिर : निखिल कुमारस्वामी
केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नाही, असे पुत्र निखिल कुमारस्वामी यांनी सांगितले. अपोलो रुग्णालयाजवळ पत्रकारांशी बोलताना, राज्यातील जनतेने काळजी करू नये. अलीकडच्या दिवसातील कामाचा ताण, 10-15 दिवस सतत दौरा, रात्री 1 वाजले तरी विश्र्रांती नाही, त्यामुळे असे झाले आहे. आज रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.