उदयपूरमध्ये अचानक जाळपोळ-तोडफोड
शाळकरी मुलांमधील वादानंतर हिंसाचार
वृत्तसंस्था/ उदयपूर
राजस्थानमधील उदयपूर शहरात विद्यार्थ्यांमध्ये चाकूहल्ला झाल्याच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे. शाळकरी मुलांमध्ये धक्काबुक्कीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी उदयपूरमधील वातावरण अचानक बिघडले. शहरात अनेक ठिकाणी जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या. अनेक वाहनेही पेटविण्यात आल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे.
जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी दोन मुले आपापसात भांडत असताना एका मुलावर चाकूने वार करण्यात आल्यानंतर ही घटना घडली आहे. या वादामध्ये जखमी झालेल्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनेनंतर बाजारपेठही बंद करण्यात आली होती. अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची मागणी करत हिंदू संघटना आंदोलन छेडत होत्या.
वादावादीची घटना शहरातील सूरजपोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे भट्टियानी चौहट्टा येथील सरकारी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यानंतर एका तऊणाने दुसऱ्याला चाकूने वार करून जखमी केले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी किशोर आणि त्याच्या वडिलांना अटक केली. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पीडित विद्यार्थ्याचे कुटुंब आरोपी विद्यार्थ्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याच्या आग्रहावर ठाम आहेत.